ओळख पटवण्याचे आवाहन
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पाटणादेवी जंगलात केदारकुंडापासून काही अंतरावर डोंगरी नदीच्या पाण्यात ३० ते ४० वयोगटातील एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. जेथे मृतदेह मिळून आला तेथून जवळच मृत व्यक्तीचे कपडे व चप्पल बुधवार दि. १० रोजी पोलिसांना मिळून आले आहेत.
दरम्यान चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला असून मयताच्या वारसाचा शोध घेतला जात आहे. तालुक्यातील पाटणादेवी जंगलात कंपार्टमेंट नं.३०३ मधील केदारकुंडापासून १०० मीटर अंतरावर डोंगरी नदी पात्रात दि. ८ डिसेंबर रोजी दुपारी १२.४० वाजेच्या सुमारास ३० ते ४० वर्षे वयोगटातील अनोळखी पुरूष व्यक्तीचा मृतदेह पाण्यात पडलेला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आला होता. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी आज १० रोजी परिसरात कसून शोधमोहीम हाती घेतली. आजूबाजूचा परिसरात शोध घेत असतांना जवळच १०० मिटर अंतरावर नदीपात्रात खडकावर मयताचे कपडे, चप्पल मिळून आले आहेत. पोलिसांनी पंचनामा करून ते ताब्यात घेतले असून मृतदेहबाबत अजून काही मिळते का म्हणून काल दिवसभर परिसराची पाहणी केली. जंगलातील मद्रासी बाबा भागात व कन्नड भागातील कळंकी, गुजरदरी गावामध्ये विचारपूस केली. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, उपनिरीक्षक राहुल राजपूत यांनी केले आहे.