जळगाव (प्रतिनिधी) – घरी लग्नाची पत्नी असताना घरात प्रेयसीला आणले अन चिडलेल्या पत्नीने थेट पोलीस ठाणे गाठत पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला.


शहरातील राष्ट्रीय महामार्गजवळ बांभोरी नाक्याजवळ वास्तव्यास असलेल्या दांपत्यात वाद होऊन पतीने दोन मुलांसह पत्नीला घरातून हाकलून लावल्याचा प्रकार समोर आला. पीडित विवाहीतेने दिलेल्या तक्रारीनुसार पती, सासू व पतीची प्रेयसी अशा तिघांविरुद्ध तालुका पेालिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सुनंदा दिनेश भोळे (वय-३८) हा पती दिनेश कडू भोळे, मुलगा अनिरुद्ध, आदित्य अशांसह बांभोरी नाका परिसरात वास्तव्यास आहेत. पती शेतीपयोगी साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. लग्न झाले तेव्हा दागिने माहेरच्यांनी दिले होते. तदनंतर घरातून वेगळे निघाल्यावर घर घेण्यासाठी भावाकडून दीड लाख रुपये देखील आणून दिल्यावर दाम्पत्याच्या नावे स्वतःचे घर झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एक महिला घरी यायला लागली. पतीला विचारल्यावर त्यांनी नातेवाईक असल्याचे सांगत तेव्हा वेळ मारुन नेली. मात्र, दोघांचे फोटो पाहिल्यावर दोघांमध्ये संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याने जाब विचारल्याने पतीसह सासूकडून छळाला सुरवात झाली. २३ ऑक्टोबरला पती दिनेश, सासू सरस्वतीबाई अशांनी अंगावरील दागिने काढून घेत दोन्ही मुलांसह घरातून हाकलून लावल्याची तक्रार सुनंदा भोळे यांनी दिली. या सर्व प्रकाराला पतीची प्रेयसी जबाबदार असून पती- सासूसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.







