आदिवासींमध्ये संताप, प्रांतांना दिले निवेदन
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- यावल तालुक्यातील वड्री येथिल तत्कालीन ग्रामसेवक यांनी २६ जानेवारी २०२० मध्ये स्थानिक आदिवासीना अंधारात ठेऊन आसरबारी येथिल परप्रंतियाना ५० वर्षापासून याच गावात राहत असल्याबाबतचे ठराव देऊन सामुहिक वन हक्क दावे दाखल केल्याच्या विरोधात मंगळवारी निवेदन देण्यात आले. यामुळे सातपुडयाच्या कुशीतील आदिवासी तडवी भिल्ल समाजात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वड्री येथील आदिवासी तडवी भिल्ल समाज यांना अंधारात ठेवून तात्कालीन ग्रामसेवक यांनी २६ जानेवारी २०२० रोजी आम ग्रामसभेमध्ये वड्री धरणालगत असलेली आसराबारी ही वस्ती येथे पन्नास वर्षापासून राहत असल्याबाबत ठराव दिला होता. त्यांचे सामूहिक वन हक्क दावा मिळण्याबाबतच्या ठराव व प्रस्ताव वनविभाग यावल यांचे कडे दिला. सदर ठराव हा गावातील युवा व समाज बांधवांना अंधारात ठेवून केल्याचे लक्षात आल्यावर व आपल्या हक्कावर घुसखोर परप्रांतीयांनी हक्क दाखवल्याचे लक्षात आल्यावर येथील युवा मंडळी पेटून उठली.