पारोळा (प्रतिनिधी) – वीज वितरण कंपनीच्या जळगाव परिमंडळाचे विभाजन करून यात पारोळ्याच्या नवीन परिमंडळाचा समावेश असावा अशी मागणी आ. चिमणराव पाटील यांनी केली आहे. या संदर्भात वीज वितरणच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काल जळगाव येथे वीज वितरण कंपनीची बैठक घेतली. त्यात आमदार चिमणराव पाटील यांनी, जळगाव परिमंडळांत ट्रान्स्फॉर्मर, शेती पंप ग्राहकांची संख्या, देखभाल-दुरुस्तीची कामे वाढल्याने कामाचा ताण पडतो. परिणामी ग्राहक व शेतकर्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून जळगावचे जळगाव व पारोळा अशा दोन परिमंडळात विभाजन करावे, अशी मागणी केली. पारोळ्याच्या नवीन परिमंडळात पारोळ्यासह अमळनेर, पारोळा, एरंडोल, भडगाव, पाचोरा व चाळीसगाव या तालुक्यांचा समावेश करावा. यामुळे कामाचा ताण कमी होऊन ग्राहक, शेतकर्यांना अधिक चांगली सेवा देता येईल, असा आग्रह आमदार चिमणराव पाटील यांनी बैठकीत धरला.
दरम्यान, नवीन उपकेंद्र, अतिरिक्त पावर ट्रान्स्फॉर्मर, लिंक लाईन टाकणे, गावठाण फीडर स्वतंत्र वीज वाहिनी याबाबत त्यांनी चर्चा केली. तर रोहित्र बदलून मिळण्यासाठी विलंब होत असून याचे निराकरण करण्याची मागणी देखील आमदार चिमणराव पाटील यांनी याप्रसंगी केली.