मुंबई (वृत्तसंस्था) – पैसे देऊन टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्यांचे नाव आले आहे. पोलिसांनी टीआरपी स्कॅमचा पर्दाफाश केल्यानंतर टेलिव्हिजन माध्यमांत खळबळ माजली आहे. यामुळे जाहिरातदार आणि मीडिया एजन्सींकडून या संबंधित टेलिव्हिजनवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे.

टीआरपी स्कॅमचा पर्दाफाश झाल्यानंतर पारले कंपनीने जाहिराती देण्याबाबत मोठा निर्णय जाहीर केला. मिळालेल्या माहितीनुसार टीव्हीवरुन पारले जी बिस्कीटाची जाहिरात केली जाणार नसल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने घोषित केले आहे.
‘सामाजिक स्वास्थ बिघडविणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणारा कंटेंट प्रसारीत करणाऱ्या टीव्ही न्यूज चॅनेल्सवर कंपनीकडून जाहिरात करण्यात येणार नाही. आमच्या या निर्णयाचे स्वागत करुन इतरही कंपन्यांनी असा मापदंड ठरविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे, टीव्ही न्यूज चॅनेल्संना यातून स्पष्ट संदेश देण्यात येईल की, आपल्या कंटेंटमध्ये बदल गरजेचा आहे.’ असे बुद्ध यांनी म्हटले.
‘टीआरपी’ म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पाँईट. म्हणजे ठराविक लोकसंख्येच्या लोकांनी ठराविक वेळेला पाहिलेल्या कार्यक्रमाची टक्केवारी. यामध्ये ठराविक जागांवर स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीचे मीटर्स जोडले जातात. या मीटर्सवरून संबंधित भागात कोणती चॅनेल, कोणत्या मालिका व जाहिरात सर्वाधिक पाहिल्या जातात याच्या प्रत्येक मिनिटाच्या नोंदी असतात.







