जळगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव तालुक्यातील पाळधी बुद्रुक येथील हायवे बायपास जवळील शेतांमध्ये जाण्या-येण्यासाठी अस्तित्वात असलेल्या शंभर वर्षापेक्षा जुन्या रस्त्यावर शैलेश कासट यांनी खड्डे खोदण्याचे सुरुवात करून शेतकऱ्यांना प्रतिबंध केल्याची घटना घडल्यानंतर त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. धरणगाव येथील तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी घटनास्थळी भेट दिली.
शैलेश कासट यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या आईच्या नावे गट क्रमांक 111 खरेदी केला होता. या गटात त्यांनी प्लॉटिंग विकण्यास सुरुवात केली. परंतु याच शेतातून इतर शेतांमध्ये जाण्यासाठी पारंपारिक वहिवाट रस्ता असतानादेखील कासट यांनी खड्डे खोदून शेतकऱ्यांचा रस्ता बंद केला. स्थानिक शेतकरी देविदास पाटील यांच्यासह गोपाळ पाटील, योगेश बारी, अमोल पाटील, मच्छिंद्र पाटील, भरत पाटील यांनी कासट यांना जुने कागदपत्र दाखवून रस्ता बंद न करण्याची मागणी केली असता कासट यांनी नकार दिला. ‘तुम्हाला जिथे जायचं असेल तिथं जा.. पण रस्ता मिळणार नाही’ अशी भाषा वापरली होती.
शेतकऱ्यांनी कासट यांचे बांधकाम थांबवून चौकशीची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली तहसीलदार यांना रीतसर तक्रार देऊन नगर रचना विभागामार्फत जागेची पूर्व तपासणी न करता परस्पर मंजुरी कशी दिली गेली, यासंदर्भात तक्रार करण्यात आली असल्याने आज तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. शेती वहिवाट कायद्यानुसार कोणत्याही शेतकर्याची पारंपरिक वाट अडवता येत नसल्याचे स्पष्ट करून लवकरच निकाल देणार असल्याचे सांगितले. तहसीलदारांनी रस्त्याची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला .