भक्तांना निस्वार्थ सेवा झाली उपलब्ध
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे श्री साई मंदिर येथील भक्त निवासाचा भूमिपूजन सोहळा रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पाळधीसह पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शरदचंद्र कासट, उपाध्यक्ष नितीन लढा, सचिव सुनील झंवर, जेष्ठ सदस्य देवकीनंदन झंवर उपस्थित होते. श्री साई मंदिर येथील भक्त निवास हे ५ हजार १०० चौरस फूट प्रशस्त हॉल असलेले व ११५० चौरस फूट डायनिंग हॉल असे आहे. निवासात २१ एसी डिलक्स खोल्या असून प्रशस्त पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे. प्रकल्पाला राज्याच्या ग्रामविकास, पंचायतराज तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन भक्त निवासाबद्दल कौतुक केले आहे.
कार्यक्रमात सुरुवातीला प्रस्तावनेतून सचिव सुनील झंवर यांनी भक्तनिवास व मंदिराच्या प्रगतीविषयी माहिती दिली. यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. भक्त निवासामुळे पाळधी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अल्प दरात भाविकांना भक्त निवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. भक्तांना निस्वार्थ सेवा उपलब्ध झाल्यामुळे साई मंदिरात आता अधिकाधिक भाविकांना लाभ घेता येणार आहे, असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
कार्यक्रमासाठी राजेश जोशी, मनीष झंवर, राजेश तोतला, शैलेश काबरा, हितेंद्र चौधरी, नरेश जोशी, दीपक ठक्कर, विपुल सुरतवाला, सतीश अग्रवाल यांच्यासह युगश्री जय साई वेअर हाऊसचे सुरज झंवर यांनी परिश्रम घेतले.