पहा नेमक्या कोणत्या सुविधा उपलब्ध झाल्या उपलब्ध ?
जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे जळगाव शहर, जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील व शेजारील राज्य मध्य प्रदेशातील बहुतांश गरीब व गरजू रुग्ण हे अत्यावस्थ स्थितीत अत्यावश्यक उपचार घेणेकामी दाखल होत असतात. त्यांच्यावर या रुग्णालयामध्ये आधुनिक पद्धतीनुसार उपचार केले जातात. रुग्णालयात दिवसेंदिवस वाढत असलेली अत्यावस्थ रुग्णांची संख्या विचार घेऊन या रुग्णालयात अजून एक अत्याधुनिक अशा यंत्रसामुग्री, साधनसामुग्रीसह सुसज्ज अतिदक्षता विभागाची उभारणी करण्याचा मानस अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे विचाराधीन होता. सदर बाब ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार रुग्णालयात एक अत्याधुनिक मॉड्युलर आयसीयु तयार करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती यांच्या माध्यमातुन २ कोटी ५० लाख इतका निधी मंजूर करुन दिला.
अत्याधुनिक आयसीयू
सदर मॉड्युलर आयसीयु हे औषधवैद्यकशास्त्र विभागांतर्गत असून त्यामध्ये एकुण-१४ खाटा आहेत. यामध्ये दाखल होणा-या जळगाव जिल्हा तसेच इतर भागातील गोरगरीब रुग्णांना चांगल्या प्रकारे उपचार मिळून अत्यवस्थ रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. यास्तव रुग्णसेवेचे हित लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक अतिदक्षता विभागाची या रुग्णालयातील उभारणी करण्यात आली आहे, असे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले.
या अतिदक्षता विभागात सतत माहिती देणारे १४ मल्टिपॅरा मॉनिटर आहेत. सदर मॉनिटर हे नर्सिंग स्टेशनच्या संगणक प्रणालीस वायरलेस पध्दतीने जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची शारिरीक स्थितीबाबतची माहिती सतत अद्यावत होत असते. त्यानुसार संबंधीत रुग्णांवर उपचार करण्यात येत असतात. मॉड्युलर पध्दतीच्या आयसीयुमध्ये रुग्णांना जंतुसंसर्गाचा धोका फार कमी प्रमाणात असतो.
सी आर्म मशिन विथ एफपीडी
अस्थिव्यंगोपचार विभागामध्ये “सी आर मशीन विथ फ्लॅट पॅनल डिटेक्टर” हे एक प्रगत वैद्यकीय इमेजिंग उपकरण उपलब्ध झाले आहे. यामुळे रुग्णांच्या हाडांवरती शस्त्रक्रिया करणे सोपे झाले आहे. कमीतकमी रक्तस्त्राव व कमीतकमी टाक्यांमध्ये शस्त्रक्रिया करणं शक्य होत आहे. सांध्यांच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया या मशीनद्वारे कमी वेळामध्ये करणे शक्य होत आहे. अस्थिव्यंगोपचारशास्त्र मधील क्लिष्ट शस्त्रक्रिया, वेदना व्यवस्थापन (अनेस्थेटिक्स) आणि आपत्कालीन प्रक्रियेदरम्यान या सी-आर्म मशीनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. या रुग्णालयामध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या उपकरणमुळे रुग्णांवर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करुन त्यांना बरे करण्यात मदत मिळणार आहे.
नाकाच्या सर्व शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे
मायक्रो डिब्रायडर व कॅमेरा हे इम्पोर्टेड मशीन जागतिक दर्जाची ‘कार्ल स्टोर्ज’या आंतरराष्ट्रीय कंपनीचे असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव ही महाराष्ट्रातील पहिलीच व एकमेव संस्था आहे जेथे या मशीनचे प्रस्थापन करण्यात आलेले आहे. या उपकरणाद्वारे नाकाच्या सर्व शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येणे आता आपल्या महाविद्यालय व रुगणालयात शक्य होणार आहे. या दुर्बिणीद्वारे नासूर, नाकाच्या बुरशीचे (म्युकरमायकोसीस), नाकाचे ऍलर्जीमुळे बनलेले मस तसेच इतर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या यशस्वीरित्या करता येतात.
कॉन्क्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया उपलब्ध
आंतरराष्ट्रीय जर्मनीच्या कंपनीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त सर्वोत्तम प्रतिचा एक्सटेरो हा ऑपरेटिंग मायक्रोस्कोप शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे प्रस्थापित करण्यात आलेला आहे. कानाच्या पडद्याला छिद्र असणे किंवा कानातील हाड सडले असल्यास त्याचा रुग्णाच्या जिवीतास धोका निर्माण होतो. तो दूर करण्यासाठी या ऑपरेटिंग मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आवश्यक ती शस्त्रक्रिया करण्यात येऊन रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी मदत होते. ज्या मुलांना जन्मतः ऐकु येत नाही व त्यांना बोलताही येत नाही, अशा मुलांना दिव्यांग म्हणून पुढील आयुष्य जगावे लागते. यावर कॉन्क्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येणे आता शक्य होणार आहे.
रक्तचाचण्या होणार सुलभ
स्वयंचलित विश्लेषक हे नवीन यंत्र जीवरसायनशास्त्र विभागात आले आहे. सदर यंत्रावर रुग्णांच्या रक्ताच्या चाचण्या/तपासण्या करण्यात येतात. त्यामध्ये ब्लड शुगर, युरिया क्रिटिन यासह विविध नवीन व इतर प्रकारच्या अनेक चाचण्या या यंत्राद्वारे करण्यात येतात. या यंत्राची जवळपास प्रतितास १ हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे.
भूलशास्त्र विभागाला मॉनिटर
येथील बधिरीकरण शास्त्र विभागाला मल्टिपरा मॉनिटरद्वारे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करतांना रुग्णांना भूल द्यावी लागते. या अत्याधुनिक यंत्राचा उपयोग रुग्णास भूल देणे व रुग्णाचे मॉनिटरिंग करण्याकरिता होतो.