धरणगाव ( प्रतिनिधी ) – अज्ञात वाहनाने मागून पॅजो रिक्षाला जोरदार धडक दिल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.
आशिष गजानन भावसार (वय-३२) रा. पारोळा नाका, धरणगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. किरकोळ धान्य विक्री करून आपला उदरनिर्वाह करत होता. धान्य विक्रीसाठी ते धरणगाव तालुक्यातील खेडेगावावर जावून विक्री करत होता. यासाठी त्यांच्या पॅजोरिक्षा आहे. नेहमीप्रमाणे रविवार २८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता अशिष हा पॅजो रिक्षा (एमएच १५ ईजी ६३०५) ने चोपडा रोडने निघाला होता. चोपडा रोडवरील कमल जिनिंग जवळ त्याची गाडी अचानक बंद पडली. त्याच वेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. यात अशिषच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाला. नागरीकांनी त्याला तातडीने उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले असता रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने भावसार कुटुंबियांवर संकट कोसळले आहे. पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याचे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.