धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील चांदसर गावात एका ९ वर्षीय अल्पवयीन मुलाला क्रूरपणे मारहाण करून गंभीर जखमी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. काम करत नाही या क्षुल्लक कारणावरून त्याला लोखंडी पकडीने चिमटे घेणे, सांडशीने मारहाण करून फेकणे आणि प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण करणे असे अमानुष प्रकार घडले आहेत. ही घटना शुक्रवारी, ६ जून रोजी दुपारी ४ वाजता घडली असून, रविवारी, ८ जून रोजी रात्री धरणगाव पोलीस ठाण्यात एका संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांदसर येथील दुर्गेश फकीरा गायकवाड (वय ९) हा मुलगा आई आणि बहिणीसोबत वास्तव्याला आहे. गावातील अमोल नामदेव पाटील नावाचा व्यक्ती दुर्गेश आणि त्याची बहीण विद्या यांना विनाकारण नेहमी मारहाण करत असे. दोन महिन्यांपूर्वी दुर्गेश कुलरमध्ये पाणी भरत असताना त्याच्याकडून फरशीवर पाणी सांडले. याच कारणावरून अमोल पाटीलने त्याला लोखंडी पकडीने हातापायांना आणि पाठीला चिमटे घेतले, तसेच सांडशीने मारहाण केली. शुक्रवारी, ६ जून रोजी संशयित आरोपी अमोल पाटीलने दुर्गेशला रस्त्यावरील खडी आणण्यास सांगितले. ती आणली नाही म्हणून त्याने दुर्गेशला नळाच्या प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण केली, ज्यात त्याच्या शरीराला फॅक्चर झाले.
दुर्गेशला मारहाण करत असताना त्याची आई आशाबाई आणि बहीण विद्या सोडवण्यासाठी गेल्या असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. या संतापजनक घटनेनंतर अखेर रविवारी, ८ जून रोजी धरणगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार, मारहाण करणारा अमोल नामदेव पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल पाटील हे करत आहेत. या घटनेने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.