मुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांना परिस्थितीची विचारणा ;

लोकप्रतिनिधी , अधिकारी पाहणीसाठी कन्नड घाटासह तालुक्याच्या दौऱ्यावर
अनेक नद्यांना पूर ; गिरणा काठावरील गावांना धोक्याचा इशारा
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे हाहाकार उडाला असून चाळीसगाव तालुक्यात पाहणी करण्यासाठी गेलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार गिरीश महाजन यांना फोनवरून संपर्क करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीची विचारणा केली जिल्हाधिकारी अभिजित राऊत , पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्यासह महत्वाचे अधिकारी सगळी परिस्थिती जातीने हाताळत आहेत लोकप्रतिनिधी , अधिकारी पाहणीसाठी कन्नड घाटासह तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत . आमदार मंगेश चव्हाण , खासदार उन्मेष पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधी बचावकार्यात सहभागासह मार्गदर्शन करीत आहेत चाळीसगाव तालुक्यात अनेक नद्यांना पूर आलेला असल्याने गिरणा काठावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे .

आज सकाळी स्थानिक प्रशासनाला या संकटाची कल्पना आल्यावर वेगाने सूत्रे हलली चाळीसगाव ते कन्नड मार्गावरच्या घाटात जवळपास ६ ठिकाणी दरडी आणि झाडे कोसळल्याचे लक्षात आल्यावर तातडीने २ तासांत धुळ्याहून एसडीआरएफच्या जवानांच्या तुकडीला पाचारण करण्यात आले या तुकडीने औट्रम घाटात मदत आणि बचाव कार्याला सुरुवात केली रस्त्यात कोसळलेली झाडे कापून हटवण्यासह दरडी कोसळालेल्या ठिकाणी मातीचे ढिगारे उपसण्याचे काम तात्काळ सुरु केले

आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार घाटात ६ ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत घाटात एक आयशर ट्रक कोसळून एकाचा जागीच मृत्यू झाला व अन्य एक जण जखमी झाला आहे चाळीसगाव तालुक्यातील अंदाजे १० गावे पाण्याखाली गेली आहेत जवळपास ८०० पाळीव जनावरे वाहून जाऊन किंवा जखमी होऊन मृत्युमुखी पडली आहेत या पावसाच्या तडाख्यात चाळीसगाव तालुक्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा १० एवढा असू शकतो अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली येतंय दोन दिवसात कन्नड घाटातील परिस्थिती पूर्ववत होऊन वाहतूक सुरु होईल अशी आशाही आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली अतिवृष्टीग्रस्त लोकांसह तालुक्यातील रस्त्यांमध्ये अडकलेल्या लोकांसाठी जेवणाची पाकिटे भाजपकडून पुरविली जातील असेही आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले

चाळीसगाव आणि कन्नड तालुक्याच्या सीमा भागात ढगफुटी झाली. ढगफुटीसदृश्य पावसामुळे भिलदारी पाझर तलाव फुटला. कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक नद्यांना पूर आलेला असतानाच गिरणा काठावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे कन्नड तालुक्यातील १२ गावांचा संपर्क तुटला आहे. पुरात दोन ट्रैक्टर व शेकडो गुरे म्हशीही वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे हाहाकार पाहायला मिळाला. चाळीसगाव शहरातून जाणाऱ्या डोंगरी व तितुर नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अर्धे चाळीसगाव शहर पाण्याखाली आले आहे. सकाळी लवकर हे पाणी आल्याने अनेक नागरीक झोपेतच होते. यामुळे अद्यापपर्यंत नुकसानीचा अंदाज आलेला नाही. नदी पात्र उथळ असल्याने शहरात पाणी शिरले. मुंदखेड़ा शिवारातून शेकडो गुरेढोरे वाहून गेल्याची शक्यता आहे.
गिरणा धरणाखालील गिरणा नदी, उपनद्यांना व नाल्यांना मोठा पूर आला आहे. छोटे-मोठे बंधारे पाझर तलाव व इतर छोट्या-मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यात मध्यरात्रीनंतर पावसाचे थैमान सुरु झाले. मुंदखेड़ा, वाकळी, रोकड़े, पानगांव,बोरखेड़ी या गावांना पुराचा वेढा पडला आहे.
गिरणा नदी काठावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात येत आहे. भडगाव व पाचोरा तालुक्यातील गिरणा नदी पात्रात आज दुपारनंतर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती व महसूल प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन सर्वांना अवगत करावे.असे गिरणा पाटबंधारे उपविभाग (चाळीसगाव ) यांनी कळविले आहे.







