शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला “एनएमसी” चे पत्र
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आणखी एक बहुमान राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (एनएमसी) कडून मिळाला आहे. कान-नाक-घसा विभागाला पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आता ३ जागा मंजूर झाल्या आहेत. याबाबत कान नाक घसा विभागातर्फे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावसह शेजारच्या जिल्ह्यातील रुग्णांनाही उपचारात दिलासा देण्याचे काम करत असून, ओपीडीत एकाच दिवशी रुग्ण तपासणीचा अकराशेचा मोठा टप्पा पार केल्यानंतर आता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निमित्ताने अनुभवी डॉक्टरांची नवी फौज रुग्णसेवेत रुजू झाली आहे. बालरोग, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र यासह इतर विविध विषयांचे ४८ अनुभवी डॉक्टर रुग्णांची तपासणी व उपचार करीत आहेत. जीएमसीतील पदवीच्या विद्यार्थ्यांची पहिली बॅच सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रातील असून, मागील वर्षात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. त्यासाठी ४८ जागा मंजूर आहेत. तीन वर्ष कालावधीचा त्यांचा अभ्यासक्रम आहे.
आता यात कान-नाक-घसा विभागाला पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आता ३ जागा मंजूर झाल्या आहेत. याबाबतचे प्राथमिक पत्र महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे. यामुळे कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरोदे, डॉ. निशिकांत गडपायले, डॉ. विनोद पवार, डॉ. ललित राणे यांनी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड उपस्थित होते. पदव्युत्तर अभ्यासक्रमांमुळे त्या-त्या विषयातील अनुभवी डॉक्टरांची सेवा रुग्णांना उपलब्ध होणार आहे. हे डॉक्टर बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागात नियुक्त असतील. रुग्णांची तपासणी, त्यांच्यावर उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय क्षेत्राला उपयुक्त संशोधन करण्याचे काम त्यांच्याकडून होणार आहे.
“एमबीबीएस चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी वरिष्ठ तज्ज्ञ अध्यापक, डॉक्टरांच्या मार्गदर्शनात रुग्णांची तपासणी, उपचार करतात. वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत विविध विषयांवर संशोधन करतात. त्यांनी केलेल्या संशोधनाचा वैद्यकीय क्षेत्राला फायदा होतो. कमी कालावधीत जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम मंजूर झाला आहे. माझ्याच विषयात आता ३ जागा मंजूर झाल्याने आनंद आहे. ही विशेष उपलब्धी आहे.
– डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता
याप्रमाणे आहेत मंजूर जागा
औषधीशास्त्र : ०५
सुक्ष्मजीवशास्त्र ०४
विकृतीशास्त्र (पॅथॉलॉजी) : ०२
जन औषधवैद्यकशास्त्र : ०४
औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन) : ०७
बालरोगशास्त्र : ०२
स्त्रीरोग व प्रसूती : ०७
बधिरीकरण : ०४
अस्थिव्यंगोपचार : ०१
शल्यचिकित्सा : ०९
क्ष-किरण : ०३
कान नाक घसा : ३