पाचोरा तालुक्यात खळबळ, पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा दाखल
पाचोरा (प्रतिनिधी):- बैल खरेदी-विक्री व्यवहाराचे बाकी असलेले ४ लाख रुपये देण्याच्या बहाण्याने बोलावून, एका पशुव्यापाऱ्यावर चाकूने गळा चिरून व डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील लोहारी-लाख दरम्यानच्या जंगलात घडली आहे.
याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहारी (ता. पाचोरा) येथील रहिवासी भगवान सुभाष बडगुजर (वय ४६, व्यवसाय- शेती व बैलगाडी खरेदी-विक्री) यांनी संशयित आरोपी समाधान रमेश पाटील (रा. मोहाडी, ता. पाचोरा) याच्याकडे बैल व्यवहाराचे ४ लाख रुपये मागितले होते. दि. १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास, समाधान पाटील याने भगवान बडगुजर यांना “तुला बैल दाखवतो आणि तुझे बाकी असलेले ४ लाख रुपयेही देतो” असे आमिष दाखवून बोलावले.


आरोपी समाधान हा फिर्यादी भगवान यांच्या मोटारसायकलवर मागे बसला. त्याने त्यांना लाख गावाजवळील जंगलात नेले. तिथे निर्जन स्थळी संधी साधून समाधान याने “तू माझ्याकडे वारंवार पैसे का मागतो? मी तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने आपल्याजवळील चाकूने भगवान बडगुजर यांच्या गळ्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता त्याने डोक्यात दगड मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर जखमी भगवान बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सपोनि कल्याणी वर्मा यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि कल्याणी वर्मा स्वतः करत आहेत. या घटनेमुळे पाचोरा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.









