पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील बिस्मिल्ला नगर, म्हसोबा मंदिर परिसरात पावसाळापूर्व नाल्यांची साफसफाई करण्याची सुरुवात नुकतीच करण्यात आलेली आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. नालेसफाईचे काम जलद गतीने झाले पाहिजे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
पाचोरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख नाल्यांची पाहणी करण्यात आली आहे त्यानुसार जेसीबी मशीनचा वापर करून सुरुवातीला बिस्मिल्ला नगर येथील नाला, म्हसोबा मंदिरजवळच्या उड्डाणपूलाखालचा नाला यांची सफाई बुधवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. यानंतर जारगाव चौफुली, भुयारी मार्ग समवेल, नागणे वाडा, छत्रपती शिवाजीनगर परिसरातील नाला, माहीजी रोडवरील नाला यासह इतर प्रमुख नाल्यांची मान्सूनपूर्व स्वच्छता आरोग्य विभागातर्फे करण्यात येणार आहे.
याकरिता स्वच्छता निरीक्षक तुषार नकवाल, वीरेंद्र घारू हे कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. सदरील नालेसफाईचे कामे ही लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.