गेल्या ७ दिवसापासून सुरू होते उपचार
पाचोरा (प्रतिनिधी) :- ‘आयआयटी’चे शिक्षण घेऊन इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून राजस्थानमधील कोटा येथे शिक्षण घेणाऱ्या वाडी शेवाळे ता. पाचोरा येथील रहिवासी बारावीच्या विद्यार्थिनीचा डेंग्यूची लागण होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पाचोरा तालुक्यात वाडी शेवाळे येथील रहिवासी रुचिका देवरे (वय १८) सध्या कोटा (राजस्थान) येथे ‘आयआयटी’च्या प्रवेश परीक्षेच्या दृष्टीने खासगी क्लासेसमध्ये शिक्षण घेत होती. रुचिकाला सात दिवसांपूर्वी ताप आला.(केसीएन)तिच्यावर कोटा येथील डॉ. आयुष गुप्ता यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर दोन दिवस ती वसतिगृहात आली. एक दिवस तिला अचानक चक्कर आले. त्यावेळी अंगात तापही असल्याने तिला पुन्हा दवाखान्यात दाखल करून तिच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्यात रुचिकाला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिला ‘आयसीयू’मध्ये दाखल करण्यात आले.
ही माहिती तिच्या वडिलांना कळविल्यानंतर ते तत्काळ कोटा येथे गेले. तिचे सीटी स्कॅन करून सोनोग्राफी करण्यात आली. सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला जनरल वॉर्डमध्ये दाखल केले. मात्र, पुन्हा तिची प्रकृती बिघडली व त्याच दिवशी रुचिकाचे दोन्ही पाय निकामी झाले. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. गुप्ता यांच्याशी चाळीसगावचे डॉ. मगर यांनीही चर्चा केली. त्यानुसार, डॉ. गुप्ता यांनी उपचार सुरूच ठेवले. उपचारादरम्यान शुक्रवारी दिनांक १८ लां सकाळी आठच्या सुमारास रुचिकाची प्राणज्योत मालवली.
रुचिका पाचोरा येथील रहिवासी तथा होळ ता. पाचोरा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील उपशिक्षक शिवदास देवरे व जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील उपशिक्षिका राजश्री आहेर यांची मुलगी आहे. रुचिकाचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न होते. रूचिकाच्या मृत्यूने पाचोरा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.