नांद्रा–पहाण रस्त्यालगत गोठ्यातून ८ जनावरांची चोरी

साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील नांद्रा–पहाण रस्त्यालगत असलेल्या गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल आठ जनावरे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरी १८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे साडे सहाच्या सुमारास घडली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
नांद्रा (ता. पाचोरा) येथील शेतकरी संजय रामदास पाटील (वय ५२) यांच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी पाच म्हशी आणि तीन पारडू असा सुमारे ३ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सकाळी गोठ्यात गेल्यानंतर जनावरे आढळून न आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पाटील यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, चोरट्यांनी गोठ्याच्या परिसरात कुणालाही संशय येऊ न देता अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केली. चोरीस गेलेल्या जनावरांमध्ये जाफर जातीच्या पाच म्हशी तसेच एक महिन्यापासून ते काही दिवसांचे तीन पारडू यांचा समावेश आहे. दरम्यान, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास पोहेकॉ. उमेश देविदास पाटील करत आहे.









