ठेकेदारावर मनमानी करीत असल्याचा आरोप
पाचोरा (प्रतिनिधी) :- पाचोरा व भडगाव शहर आणि तालुक्यात महावितरण कंपनीकडून जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवल्या जात असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने तीव्र आंदोलन केले आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी, स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांची परवानगी घेतली जात नाही, असा आरोप शिवसेनेने केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ग्राहकांच्या परवानगीशिवाय मीटर बदलण्यास मनाई केली असतानाही ठेकेदार मनमानी करत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला. यासोबतच, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवू नये असे स्पष्ट निर्देश दिले होते, तरीही ठेकेदार स्वतःच्या फायद्यासाठी हा प्रकार करत असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. जर हे जबरदस्तीचे स्मार्ट मीटर बसवणे थांबवले नाही, तर शिवसेना शिवसेना स्टाईलने उत्तर देईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख सुमित सावंत, बंडूभाऊ केशव सोनार, अन्वर शेख, गोपाल भोई, भारत राजेश भैरू, अमन किसन झनझोटे, पंकज गोसावी, शेरू शेख, करण कंडारी, रोहन पवार, मसूद शेख, दीपक मिस्तरी, अल्ताफ खान, संदीप पाटील, विजू माळी, दीपक पाटील, नितीन पाटील, आणि संदीप पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.