आमदारांसह जिल्हा पोलिस अधीक्षकांची लाभणार उपस्थिती
पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील पोलिस लाईन या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलिस स्टेशन तसेच अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी ११ वाजता आ. किशोर पाटील यांचे हस्ते होणार असून यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचेसह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
पाचोरा शहरातील भडगाव रोड स्थित पोलिस कर्मचारी निवासस्थानांची झालेली दुर्दशा पाहता तसेच शहराचा वाढलेला विस्तार लक्षात घेता आ. किशोर पाटील यांनी गृह विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत तब्बल २१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळवली आहे. एकच ठिकाणी पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचे निवासस्थानांचे बांधकाम केले जाणार असून यामुळे पोलिस बांधवांच्या कामात अधिक सुसूत्रता येणार आहे या कामामुळे दुरावस्था होऊन मोडकळीस आलेल्या पोलिस वसाहती मधील निवाऱ्यांपासून त्यांना सुटका मिळणार आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाला आ. किशोर पाटील,जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,प्रांताधिकारी भूषण अहिरे, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, तहसीलदार विजय बनसोडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, मुख्याधिकारी मंगेश देवरे,पोलिस निरीक्षक अशोक पवार यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्वांनी या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.