पुरुष भातखंडेचा तर महिला, मुलगा बारामती तालुक्यातील !
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशन जवळ स्त्री-पुरुषाने ४ वर्षीय मुलासह रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दिनांक ५ मे रोजी रात्री १० वाजता उघडकीस आली होती. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी ओळख पटविली असून पुरुष भातखंडे ता. पाचोरा येथील तर महिला व मुलगा हे बारामती येथील असल्याचे दिसून आले आहे. तर विवाहबाह्य प्रेमातून लग्नाला नकार मिळाल्यामुळे दोघांनी ४ वर्षीय मुलासह आत्महत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.
पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानक दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७६ / १९ नजीक एक महिला, पुरुष व एक लहान बालक रेल्वे पटरीवरुन चालत येत असताना मनमाडकडुन भुसावळकडे जाणाऱ्या २२१०३ अयोध्या सुपरफास्ट एक्स्प्रेस समोर आल्याने तिघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती अयोध्या एक्स्प्रेसचे लोकोपायलट डी. एफ. डिसुझा यांनी पाचोरा रेल्वे स्टेशन मास्तर यांना दिली. सोमवार दि. ५ मे रोजी रात्री १० वाजेच्या या सुमारास घटना घडली. (केसीएन)यानंतर पोलिसांनी सदर मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये हलविले.
तर या कुटुंबाने आत्महत्या नेमकी का केली व त्यांची ओळख पटवण्याचे आवाहन आता पोलिसांकडून केले गेले होते. पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, उपनिरीक्षक योगेश गणगे, हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, मनोहर पाटील, अशोक हटकर, समाधान भोसले आदी कर्मचाऱ्यांनी तपास सुरु केला. त्यात पुरुषाचे नाव राजेंद्र निंबा मोरे (वय २३, रा. भातखंडे ता. पाचोरा) असे असून मयत महिलेचे नाव राधिका लहू ठाकरे (वय २५, रा. बारामती) तर मुलाचे नाव सारंग लहू ठाकरे (वय ४, रा. बारामती) असे आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. राजेंद्र व राधिका यांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. त्यांना विवाह करायचा होता. मात्र दोन्ही घरातून विरोध झाल्यामुळे त्यांनी रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात प्रथमदर्शनी दिसून येत आहे.