पाचोरा-भडगावला कार्यकर्त्यांनी बोलले नवस
पाचोरा (प्रतिनिधी) :- पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजयी होऊन ‘हॅट्रिक’चा नवा इतिहास रचणारे आमदार किशोर पाटील सुमारे ३९ हजार विक्रमी मतांनी विजयी झाले. त्यांची एकूणच विकासाची कार्यप्रणाली पाहता, त्यांना मंत्रिपद मिळावे यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी परमेश्वराला साकडे घातले आहे. अनेकांनी विविध प्रकारचे नवस देखील मानले आहेत.
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत कोणीही सलग तिसऱ्यांदा विजय प्राप्त केलेला नव्हता. माजी आमदार के. एम. पाटील, ओंकार वाघ यांनी आलटून पालटून मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. माजी आमदार सु. भा. पाटील, आर. ओ. तात्या पाटील व विद्यमान
आमदार किशोर पाटील हे आतापर्यंत सलग दोनदा विजयी झाले आहेत. या निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांनी सुमारे ३९ हजारांचे मताधिक्य घेत सलग तिसऱ्यांदा विजय प्राप्त करुन विजयाची ‘हॅट्रीक’ केली.
त्यांनी गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात केलेली नाविण्यपूरण विकासकामे तसेच त्यांच्या विकासाचे व्हिजन लक्षात घेता त्यांना नवीन मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळावे अशी मागणी व अपेक्षा पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांमधून व्यक्त होत आहे. त्यासाठी अनेकांनी परमेश्वराला साकडे घातले आहे.
काहींनी आपल्या कुलदेवतेला नवस मानले आहेत. आमदार किशोर पाटील हे निकाल लागताच विजयी मिरवणुकीतून निघून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या विमानाने शनिवारी सायंकाळीच मुंबईकडे रवाना झाले. नव्या मंत्रिमंडळासाठीच्या हालचाली सुरू झाल्याने आमदार किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळेल, असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला आहे.