वावडदा ता. जि. जळगाव ( प्रतिनिधी) – येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री जितेंद्र पाटील सर यांची उपस्थिती लाभली होती. सर्वप्रथम शाळेचे क्रीडा शिक्षक श्री आनंद जाधव यांच्या परेड पथकाने मान्यवरांना ध्वजारोहणासाठी आमंत्रित केले. तदनंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर परेड पथकाने ध्वजाला मानवंदना देत परेड केली. यानंतर शाळेतील विद्यार्थी सुशांत साळुंखे शिक्षक श्री नितीन तायडे, शिक्षिका सौ स्वाती जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच गायन शिक्षक श्री रितेश धनगर यांच्या समूहाने देश पर भक्ती गीते सादर केली, यानंतर नृत्य शिक्षिका श्रीमती अन्वेषा माहेश्वरी यांच्या नृत्य समूहाच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी देश पर भक्ती गीतांवर नृत्य सादर केले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये विशेष उत्साह दिसत होता. आलेले प्रमुख पाहुणे श्री जितेंद्र पाटील यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती रत्ना माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका सौ भारती पवार यांनी मानले. अशाप्रकारे उत्साहात कार्यक्रमाची सांगता झाली. शेवटी विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करून सोडण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख सौ. सुजीता साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले तर शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.