धनादेश अनादरित झाल्याने जळगाव न्यायालयाचा निकाल
जळगाव (प्रतिनिधी): उधारीने घेतलेल्या औषधांच्या पैशांसाठी दिलेला धनादेश (चेक) बँकेत न वटल्याने (चेक बाऊन्स), जळगाव येथील शिव कॉलनी परिसरातील औषध विक्रेत्याला न्यायालयाने एक वर्षाची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच फिर्यादीला दीड लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

जळगाव येथील ‘वैभव मेडिको’चे प्रोप्रायटर गोविंद विवेक नवाल (होलसेल औषध व्यापारी) यांच्याकडून ‘निर्मल फार्मा’चे मालक दिनेश गोविंद कुमावत (रा. शिव कॉलनी स्टॉप, जळगाव) यांनी वेळोवेळी उधारीवर औषधे खरेदी केली होती. ३१ जुलै २०२० पर्यंत कुमावत यांच्याकडे १ लाख २६ हजार ४११ रुपये थकबाकी होती. ही थकबाकी फेडण्यासाठी दिनेश कुमावत यांनी ६ नोव्हेंबर २०२० रोजीचा बँक ऑफ बडोदा (रिंगरोड शाखा) या बँकेचा धनादेश नवाल यांना दिला होता. नवाल यांनी हा धनादेश बँकेत वटवण्यासाठी टाकला असता, तो संशयित आरोपीने स्वतःहून दिलेल्या ‘स्टॉप पेमेंट’ (पेमेंट थांबवा) या शेऱ्यानिशी परत आला. नवाल यांनी कायदेशीर नोटीस पाठवूनही कुमावत यांनी पैसे दिले नाहीत, उलट खोटे उत्तर पाठवले.
या प्रकरणी गोविंद नवाल यांनी जळगाव येथील न्यायालयात खटला दाखल केला. ५ वे न्यायदंडाधिकारी एम. एम. निकम यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले. फिर्यादीतर्फे नोंदवण्यात आलेला तोंडी आणि लेखी पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने दिनेश कुमावत यांना दोषी ठरवले. न्यायालयाने एक वर्षाचा कारावास, तसेच १ लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीला देण्याचे आदेश दिले आहेत. नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास अतिरिक्त एक महिन्याची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात फिर्यादी नवाल यांच्या वतीने ॲड. हेमंत आर. गिरणारे आणि ॲड. रघुनाथ आर. गिरणारे यांनी काम पाहिले.









