गेपिंपरी चिंचवड – ल्या पाच दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. यावेळी ग्रामीण भागांसह शहरी भागातही पावसाची कोसळधार पाहायला मिळत आहे. तळकोकणापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील अनेक भागांत काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. तर काही भागांत वीजपुरवठाही बंद आहे. काही भागांत साचलेलं पाणी घरांत जाऊन पोहोचलं आहे. दरम्यान, पुढील 3 ते 4 दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुसळधार पावसामुळे पुणे-सोलापूर हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. तर पुण्यातही सकाळी पावसाने उसंत घेतली असली तरी रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. साचलेल्या पाण्यामुळे पुण्यातही अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच अनेक भागांत ट्रॅफिक जॅम झालं आहे. याशिवाय इंदापूर, पंढरपूर, सांगली या भागांतही मुसळधार पाऊस कोसळत आहे.
पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले आहेत. काल संध्याकाळपासून पावसाने झोडपून काढले आहे. पुण्यामध्ये आता पाऊस थांबला आहे. काल कर्वेरोडवरचा नेहरु वस्तीमधील काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं. आता वस्तीमधलं पाणी ओसरलं आहे. पण घरांमध्ये पाणी शिरल्याने खूप नुकसान झालं आहे. तसंच काही कोविड सेंटरमध्ये देखील पाणी शिरल्याने प्रशासनासह कोविड रुग्णांची देखील तारांबळ उडाली. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. या रस्त्यावरून काही प्रमाणात वाहन वाहतूक करताना पाहायला मिळत आहेत. मात्र काही वाहन याठिकाणी बंद देखील पडली आहेत. काल रात्री काही वेळासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. कालच पुण्यातील पावसाचा जोर काही वेळात कमी होईल असा अंदाज वेधशाळेने दिला होता.
पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस कोसळतोय. गेल्या तीन तासापासून पावसाची संततधार सुरूच. मावळ तालुक्यात ही पाऊस बरसतोय. रात्रभर पावसाने जोर सुरूच ठेवला तर पवना धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतोय. त्यामुळे पवना नदी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुण्यातील चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रिमझीम पावसास सुरुवात झालेली असून यापूर्वीच धरण 100 टक्के भरले आहे. जर पावसाचे प्रमाण वाढले तर धरणातून केव्हाही पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडावा लागेल. त्यामुळे भीमा नदी काठावरील सर्व गावातील, शहरातील नागरीकांना सतर्क रहाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सिंधुदुर्गात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून सकाळी काहीशी उसंती घेतल्यानंतर पुन्हा पावसाला जिल्हात सर्वत्र सुरुवात झाली आहे. परतीचा पाऊस अजून काही दिवस रेंगाळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भातशेती उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. डोळ्यासमोर बहरलेलं पिवळं सोनं निसर्गाच्या लहरीपणामुळे मातीमोल होत असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. एकीकडे शेतकरी परतीच्या पावसामुळे अडचणीत सापडला असून दुसरीकडे मच्छीमारही संकटात आहे. अगोदरच वातावरणातील बदलामुळे मासेमारीसाठी गेल्यावर मासे मिळत नाही त्यात आता समुद्रात निर्माण झालेल्या वादळं सदृश्य परिस्थितीमुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे निर्देश मच्छीमारांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे स्थानिक बोटीसह परराज्यातील शेकडो बोटी देवगड बंदरात दाखल झालेल्या आहेत. कोकणातील सर्वात सुरक्षित बंदर असलेल्या देवगड बंदरात शेकडो बोटी आश्रयाला आल्या आहेत. त्यामुळे तळकोकणात बळीराजा आणी मच्छीमार दोन्ही आस्मानी संकटात सापडलेले आहेत.
गेल्या दोन तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील बहुतेक धरणं आता ओव्हर फ्लो झाली आहेत. अपवाद फक्त मांजरा धरणाचा आहे. मांजरा धरणामध्ये सध्या 80 टक्के पाणीसाठा आहे. मात्र जिल्ह्यातील मोठ्या धरणांपैकी असलेल्या माजलगाव धरण त्यानंतर बिंदुसरा धरण ओसंडून वाहताना पाहायला मिळतंय. माजलगाव धरणाचे यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा सगळे दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे. जायकवाडीतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने जायकवाडी धरणाचे पुन्हा एकदा 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत. बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे.
साताऱ्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पाऊसाने म्हसवड परिसरात धुमाकुळ घातला आहे. मानगंगा नदीला महापूर आला असून म्हसवड गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. विरकरवाडी, शिरताव, देवापूर, पळसावडे, बनगरवाडी, पुळकोटी, वरकोटी मलवडी, जांबूळणी अशा 12 वाड्यांचा संपर्क तुटला आहे. दुष्काळी पट्यात मोडणाऱ्या या भागांत पावसाच्या हाहा काराने पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. साताऱ्यातील वीर, उरमोडी, कन्हेर, धोम, धरणाचेही दरवाजे उघडले आहेत. वीर धरणातून 4500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. उरमोडी धरणातून 3500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धोम धरणातून 10 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही तासांत परिस्थिती गंभीर होण्याच्या शक्यतेने प्रशासकीय यंत्रणा अलर्ट आहेत.







