रावेर तालुक्यात निंभोरा पोलीस स्टेशनचा यशस्वी तपास
रावेर (प्रतिनिधी) :- अॅमेझॉन कंपनीकडून मागवलेल्या ऑनलाईन मोबाईलऐवजी ग्राहकाला पार्सलमधून साबण मिळाल्यानंतर तांदलवाडी येथील सुनील दशरथ पाटील यांनी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याची उकल करीत निंभोरा पोलिसांनी पार्सल पोहोच करणाऱ्या डिलेव्हरी बॉयला अटक केली आहे. त्याच्याकडून ५२ हजार ७४८ रुपये किंमतीच्या वस्तू जप्त केल्या आहे. संशयीताला अटक केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रुकेश तुकाराम पाटील (वय ३५, रा.कडगाव, ता.जि. जळगाव) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. सुनील पाटील यांनी १२ हजार ५०० रुपये किंमतीचा रियल मी कंपनीचा फाईव्हजी मोबाईल नारझो एन ५ सिरीज अॅमेझॉनवर ऑर्डर केला. मात्र अॅमेझॉन कंपनीच्या पार्सल विभागातील डिलिव्हरी कर्मचार्याने मोबाईलच्या बॉक्समध्ये फिर्यादीस २ संतूर साबण व ३ लहान डेटॉल साबण देऊन त्याची फसवणूक केली. याबाबतच्या तक्रारीवरून निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती. याबाबतीत पोलिसांनी डिलिव्हरी मॅनने हा घोटाळा केल्याचे शोधून काढले.
संशयित आरोपी रुकेश तुकाराम पाटील याच्याकडून मोबाईलसह एकूण ५२ हजार ७४८ रुपये किंमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. ही कारवाई फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, सुरेश भीमराव अडायगे यांनी केली. आरोपीस रावेर न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीने आणखी कुणाची फसवणूक केली आहे का ? याचा शोध पोलीस घेत आहेत.