सायबर पोलिसांनी नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा
जळगाव ( प्रतिनिधी ) – सोशल मीडियावरून वाढलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत ऑनलाईन गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अमळनेर येथील दंतचिकित्सक डॉ. विकास सोमेश्वर पवार यांना तब्बल २७ लाख ९५ हजार ६३० रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डॉ. पवार यांनी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील मुंदडा नगर परिसरात राहणारे आणि ‘कृष्णा डेंटल क्लिनिक’ चालवणारे डॉ. विकास पवार (वय ४८) हे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ऑक्टोबर महिन्यात ‘अंकिता देसाई’ नावाच्या महिलेची फेसबुकवरून ओळख झाली. संवाद वाढल्यानंतर तिने स्वतःला ‘ट्रस्ट बुकिंग कस्टमर सर्व्हिस’ या ऑनलाईन गुंतवणूक कंपनीशी जोडलेले असल्याचे सांगून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले.
सुरुवातीला १० हजार रुपयांची गुंतवणूक केल्यावर अॅपमध्ये ९०० रुपयांचा नफा दिसल्याने डॉ. पवार यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्या महिलेने विविध “रिव्ह्यू टास्क” पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांवर पैसे भरण्यास सांगितले. विश्वासात घेत सातत्याने पैसे भरण्यात आले आणि एकूण रक्कम २७ लाख ९५ हजार ६३० रुपयांवर पोहोचली. अॅपमध्ये ३६ लाखांहून अधिक रक्कम नफ्याच्या स्वरूपात दाखवली गेली, मात्र रक्कम परत घेण्याचा प्रयत्न करताच व्यवहार थांबले.
संशय निर्माण झाल्यावर डॉ. पवार यांनी ‘अंकिता देसाई’शी संपर्क साधला असता तीने उडवाउडवीची उत्तरे देत आणखी पैशांची मागणी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवली. त्यानुसार जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सायबर पोलिसांनी नागरिकांना इशारा देत म्हटले आहे की, सोशल मीडियावरील ओळखी किंवा ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषांवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करण्यापूर्वी संबंधित कंपनीची प्रामाणिकता आणि व्यवहारांची पडताळणी करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.









