मुंबईतील घटना, भुसावळ शहरात शोककळा
मुंबई/भुसावळ (प्रतिनिधी) :- भुसावळ येथील रहिवासी आणि मुंबई येथे कार्यरत तरुण पोलीस कर्मचाऱ्याचा मुंबई येथे कर्तव्यावर असताना एका भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. भुसावळ येथे शोककळा पसरली आहे.
ऋषभ दिलीप पाटील (वय २८, रा. श्रद्धा नगर, भुसावळ) असे मयत तरुण पोलिसाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, विवाहित बहीण असा परिवार आहे. ते गेल्या ३ वर्षांपासून मीरा भाईंदर येथील पोलीस स्टेशनला कार्यरत होते. (केसीएन)ऋषभ पाटील यांचे वडील हे. कॉ. दिलीप पाटील यांचेदेखील २०१५ साली भुसावळच्या नाहाटा चौकात एका अपघातातच निधन झाले होते. त्यांच्या जागी अनुकंपावर ऋषभला नोकरी मिळाली होती. तर पोस्टिंग मुंबई येथे होती.
दरम्यान, मीरा भाईंदर परिसरात कार्यरत असताना ऋषभ पाटील हे कर्तव्यावर असताना दुचाकीने जात होते. त्यावेळी बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांना एका भरधाव टँकरने धडक दिली.(केसीएन) यात जखमी ऋषभ यांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, भुसावळ येथे घटनेची माहिती कळताच वातावरण शोकाकुल झाले. दरम्यान, पित्याप्रमाणेच मुलाचाही अपघातात हृदयद्रावक मृत्यू झाल्याने भुसावळ येथील श्रद्धा नगर येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.