नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने डोकेवर काढले आहे. भारतामध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनबाधितांचा आकडा 976 वर पोहोचला आहे. ओमिक्रॉनची आणखी दोन नवे लक्षणं समोर आली आहेत. मळमळ , भूक न लागणे हेही ओमिक्रॉनचे लक्षण असून ही लक्षणे आढळल्यास तातडीने आयसोलेट होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सर्दी, खोकला, तीव्र डोकंदुखी, ताप, अंगदुखी ही आतापर्यंत ओमिक्रॉनचे सामान्य लक्षणे होती. मात्र आणखी दोन लक्षण असल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या दाव्यानुसार मळमळ होणे आणि भूक न लागणे ही ओमिक्रॉनची आणखी दोन प्रमुख लक्षणे आहेत.
विशेष: ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोनही डोस घेतले आहेत आणि त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली, अशा रुग्णांमध्ये मळमळ आणि भूक न लागणे ही लक्षणे आढळून आल्याचा दावा अमेरिकेतील आरोग्य तज्ज्ञांच्या टीमने केला आहे. सामान्यपणे सर्दी खोकला, डोके दुखी, अंग दुखी ही ओमिक्रॉनची लक्षणे आहेत.
कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव अधिक गतीने होत असल्याचे दिसून येत आहे. भारतामध्ये ओमिक्रॉनचा वेग पहाता मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज आहे.