जळगाव – जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. जळगाव जिल्ह्यात देखिल कोरोनाच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र आत्मविश्वास आणि जगण्याची उमेद असलेल्या रूग्णांसमोर कोरोनाही हार मानत असल्याचे चित्र आता दिसून येत आहे. यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील ९२ वर्षीय अमृत पवार या आजोबांना कोरोनाची लागण झाली होती. या आजोबांना श्वास घ्यायला त्रास होत होता. तसेच त्यांना कफ आणि अशक्तपणाही आला होता. त्यामुळे त्यांना दि. ८ जुलै रोजी डॉ. उल्हास पाटील कोविड रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी कोरोना फ्रंटवॉरीयर असलेले डॉ. वैभव पाटील व डॉ. केतकी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. चंद्रय्या कांते, डॉ. पाराजी बाचेवार यांच्या टीमने ९२ वर्षीय कोरोना बाधित आजोबांवर उपचार केले. आत्मविश्वास, जगण्याची जिद्द आणि डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील यशस्वी उपचारामुळे ९२ वर्षीय आजोबांनी कोरोनाला हरवले. कोरोनोमुक्त झाल्यानंतर त्यांना आज रूग्णालयातुन सुटी देण्यात आली. कोरोनाला घाबरू नका, त्याचा आत्मविश्वासाने मुकाबला करा, नक्कीच सगळे जण या संकटावर मात करतील असा संदेशही आजोबांनी दिला आहे. ९२ वर्षीय आजोबा कोरोनामुक्त झाल्याने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील कर्मचार्यांनी टाळ्या वाजवत त्यांच्या जिद्दीला सलाम केला.







