जळगाव शनिपेठ पोलिसांची दमदार कामगिरी : सीसीटीव्ही, फास्टटॅग ठरले महत्वाचे
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात मालेगाव येथून न्यायालयीन कामकाजानिमित्त आल्यावर तेथील काम संपल्यावर परत जात असताना २ सराईत महिला चोरांनी सराफ बाजारात दीड लाखांचे दागिने लांबविल्याचा तपास पोलिसांनी लावला आहे. सीसीटीव्ही फुटेज, फास्ट टॅगवरून या महिलांचा शोध लागला. बालाजी पेठ, सराफ बाजार येथील गोयल ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्या २ महिलांना शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. या महिलांनी बुरखा घालून सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना समोर आली होती, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
सराफ बाजार पेठेतील विश्वनाथ हनुमानदास अग्रवाल (वय ६९) यांच्या गोयल ज्वेलर्स दुकानात २ बुरखाधारी महिलांनी दि. २८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता दुकानातून २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती . याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. गोयल ज्वेलर्समध्ये बसवलेल्या आणि पोलिस विभागाच्या ‘नेत्रम’ कॅमेर्यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. यामध्ये संशयित महिला चोरी करून सुभाष चौक, घाणेकर चौकातून पायी जात असल्याचे आढळले. त्यानंतर त्या बळिराम पेठ परिसरात एका वाहनात बसताना दिसल्या.
सीसीटीव्हीच्या आधारे त्या वाहनाचा क्रमांक (एमएच १४ डीएफ ५७०३) असल्याचे निष्पन्न झाले. वाहनाच्या फास्ट टॅग डिटेल्सच्या मदतीने तपास पुढे नेण्यात आला. वाहन चालक आसिफ मो. रफिक अहमद अन्सारी (वय-२२, रा. मालेगाव, जि. नाशिक) याच्याशी संपर्क साधला असता, त्याने दि. २८ जानेवारी रोजी सईदा रहमतुल्ला अन्सारी (वय-४१) आणि इरफाना बानो अल्लाहबक्ष शेख (वय-४४) या दोन महिलांना जळगाव येथे भाड्याच्या गाडीने आणले होते अशी माहिती दिली. त्यानुसार पोलीसांनी दोन्ही महिलांना मालेगाव येथून अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
या दोन्ही महिलांवर यापूर्वीही विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे आढळले. त्या न्यायालयीन कामानिमित्त जळगावला आल्या होत्या आणि परतीच्या मार्गावर त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. दोन्ही महिलांची अधिक चौकशी केली असता दोन्ही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वेगवेगळे चोरीचे सात गुन्हे दाखल आहे. शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय साजिद मंसुरी, पीएसआय योगेश ढिकले, पोहेकॉ विजय खैरे, पोना किरण वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, काजल सोनवणे यांनी केली आहे.