जळगाव ( प्रतिनिधी ) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व नूतन मराठा महाविद्यालय यांच्या वतीने पी. एम. उषा – सॉफ्ट कॉम्पटेंट अंतर्गत एकदिवसीय आदिवासी समाज विकास कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. देशमुख होते.
उद्घाटन एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार, प्राचार्य डॉ. लता मोरे, प्रा. डॉ. मोहन पावरा, मिलिंद पाइकवार, उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील, समन्वयक प्रा. राकेश गोरसे आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रास्ताविक प्रा. राकेश गोरसे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उपाय योजना, युवा पिढीकडून अपेक्षित सामाजिक सहभाग, विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, व्यक्तिमत्व विकास यावर मार्गदर्शन केले.
सकाळच्या पहिल्या सत्रात एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सरकार विविध शासकीय योजना राबवते मात्र अपुरी संसाधने, शिक्षणाच्या भाषेचा अडथळा, जात प्रमाणपत्र मिळविण्यातील अडचण यावर उपाय म्हणून मातृभाषेतून शिक्षण देणे, मूलभूत सुविधा वाढविणे, शिष्यवृत्ती प्रक्रिया सुलभ करणार असल्याचे प्रतिपादन केले.तसेच आदिवासी गावपाड्यांमध्ये शासनाचा बऱ्याच योजना पोहोचल्या नाहीत. या भागात रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, शाळा, गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी आदिवासी विभाग नेहमी तत्पर असून लोकसहभाग तसेच आदिवासी भागांमध्ये जनजागृती झाली पाहिजे असे प्रतिपादन केले.
दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. लता मोरे यांनी आदिवासी महिलांची जीवनकौशल्य या विषयावर मार्गदर्शन केले. आदिवासी महिलांचे आर्थिक, आरोग्य, शिक्षण, सामाजिक, राजकीय सहभाग यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आर्थिक सक्षमीकरण, आरोग्यसेवा पुरुषांचा बरोबरीने मिळवून देण्यासाठी सामाजिक जाणीव करणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले. दुपारच्या सत्रात प्रा. डॉ. मोहन पावरा यांनी आदिवासी समाजाच्या आर्थिक समस्या व त्यावरील उपाय यावर प्रकाश टाकला तसेच आदिवासी समाजाच्या रोजगाराच्या संधी, शासकीय योजना यावर मार्गदर्शन केले.
चौथ्या सत्रात अनिल पाटील यांनी आदिवासी समाजाच्या सामाजिक समस्यामध्ये जमीनचे विस्थापन, शिक्षणाचा अभाव, गरिबी, बेरोजगारी, आरोग्यसेवांची उपलब्धता नसणे, आर्थिक दुर्बलता तसेच सांस्कृतिक व सामाजिक विषमता या समस्यावर मात करण्यासाठी आदिवासी समुदायाने संस्कृतीचे जतन करणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कमरीन शेख यांनी तर आभार प्रा. डॉ. समाधान पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. आर. बी. देशमुख, प्रा. घनश्याम पाटील, प्रा. धनंजय रायसिंग, प्रा. विशाल पाटील, प्रा. गणेश देशमुख आदींनी परिश्रम घेतले.