पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील, वाडी शेवाळे, शिंदाड, सावरा पिंपरी, सातगाव डोंगरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे येथील शेती पिकांचे व घरांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत उपलब्ध करून दिली जाईल,असे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. पाचोरा व जामनेर तालुक्यातील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या गावांची पाहणी त्यांनी आज केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री बोलत होते.
यावेळी त्यांच्या समवेत आ. किशोर पाटील, प्रांताधिकारी भूषण अहिरे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर डी पाटील, रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले, या परिसरातील शेती पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून काही भागातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरांचे सुद्धा नुकसान झाले असून पुरामुळे अनेक गावात गुरे,दगावली असून पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून,स्थानिक व्यापाऱ्यांच्या मालाचे व दुकानाचे सुद्धा नुकसान आहे.नुकसानग्रस्त भागात महसूल व कृषी विभागाच्या मदतीने पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून उर्वरित भागात तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी समजून घेऊन त्यांना मदत मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य संबंधित अधिकाऱ्यांनी करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.पाचोरा तालुक्यातील,शिंदाड, सार्वे बु., सातगाव या गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करताना, पालकमंत्री पाटील यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना धीर दिला. शासन पूर्णपणे आपल्या पाठीशी असून आपणास जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करेन,असे त्यांनी यावेळी सांगितले. तालुक्यातील शिंदाड या गावात थेट बांधावर जाऊन शेतातील संपूर्ण माती व पीक वाहून गेलेल्या शेतांची पाहणी करताना ते स्वतः भावूक झाले.या पाहणी दौऱ्या दरम्यान तालुक्यातील महसूल सार्वजनिक बांधकाम आरोग्य. आदी विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.