जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शहर पोलिस स्टेशनपासून जवळ असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ व्यापारी संकुलात अज्ञात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून रोख रक्कम व मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार आज बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. चोरटे सुमारे अर्धा तास धुमाकूळ घालत होते, मात्र जवळच असणाऱ्या पोलिसांना काहीच सुगावा न लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
टॉवर चौकातून पुढे गेल्यावर डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी व्यापारी संकुल आहे. व्यापारी संकुलात रविंद्र सुकलाल वाणी यांचे दु.क्र.२९ हे विजय पान मंदिर दुकान आहे तर जवळच रमेश सपकाळे यांची जय बजरंग नावाने पान टपरी आहे. मंगळवारी रात्री ७ वाजता दोघे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत दोन्ही दुकानांचे कुलूप तोडून संधी साधली. चोरट्यांनी रविंद्र वाणी यांच्या दुकानातून ७०० रुपयांचे सिगारेटचे पाकीट, २०० रुपयांची चिल्लर आणि टेबल फॅन असा २५०० चा ऐवज लंपास केला. रमेश सपकाळे यांच्या दुकानातून चॉकलेटची बरणी आणि चिल्लर असा ऐवज लंपास केला.
या घटनेमुळे चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. नूतन पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याकडून सर्व पोलीस ठाण्यांची शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे.