उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कवी संमेलन

मान्यवर कवींनी सादर केल्या सामाजिक, भावनिक व विवेकी आशयाच्या कविता
जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्या वतीने १४ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत असून, त्यानिमित्त दि. १९ जानेवारी २०२६ रोजी मान्यवर कवींचे कवी संमेलन उत्साहात पार पडले. या कवी संमेलनात जळगाव येथील कवयित्री पुष्पा साळवे, वडजी (ता. भडगाव) येथील कवी डॉ. वाल्मीक अहिरे तसेच धुळे येथील कवी अरविंदा भामरे यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. म. सु. पगारे होते.
या कवी संमेलनाच्या एकूण तीन फेऱ्या पार पडल्या. पहिल्या फेरीत कवयित्री पुष्पा साळवे यांनी ‘श्रमिक’ ही कविता सादर करत श्रमिकांच्या जीवनातील संघर्ष व श्रमाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. डॉ. वाल्मीक अहिरे यांनी ‘जा मी नाही खात’ ही बालकविता सादर करून लहान मुलीच्या भावविश्वाचे चित्र उभे केले. कवी अरविंदा भामरे यांनी ‘आसवांचा विद्रोह’ या कवितासंग्रहातील कविता सादर करत जाती-पातीच्या भेदाभेदातून होणाऱ्या मानवी वेदनांवर प्रकाश टाकला. यावेळी अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. पगारे यांनी त्यांच्या ‘बा, तथागता!’ या विशाल काव्यामधील विवेकी सत्याचा शोध घेणाऱ्या ओळी सादर केल्या. साहित्यिक कोणत्याही स्तुतीसाठी साहित्यनिर्मिती करत नसून अनुभवातून आलेली परिपक्व जाणीव समाजव्यापक व्हावी, हीच साहित्यनिर्मितीमागची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
दुसऱ्या फेरीत कवयित्री पुष्पा साळवे यांनी ‘पुस्तक’ या कवितेतून पुस्तकांचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. डॉ. वाल्मीक अहिरे यांनी ‘काळ्या काळ्या पोरीसंग लगीन लावलं मामांनं’ या कवितेतून रंग-रूपापेक्षा गुणांचे महत्त्व मांडत वातावरणात हलकेफुलके हास्य निर्माण केले. कवी अरविंदा भामरे यांनी ‘लेकरांसाठीची आई’ ही कविता सादर करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीचे विदारक जीवन उलगडून दाखविले. यावेळी प्रा. पगारे यांनी ‘प्रज्ञास्पंदनेचे सौंदर्यशास्त्र’ या ग्रंथातील मृत्यूविषयक चिंतन मांडत, अज्ञानामुळे माणूस भयग्रस्त राहतो; मात्र ज्ञानप्राप्तीनंतर सत्याला सामोरे जाण्याचे सामर्थ्य प्राप्त होते, असे विचार मांडले.
तिसऱ्या फेरीत कवयित्री पुष्पा साळवे यांनी ‘बाईपण’ या कवितेतून मुलगी, बहीण, पत्नी व आई या भूमिका निभावताना स्त्रीला सहन कराव्या लागणाऱ्या वेदनांचे प्रभावी चित्रण केले. डॉ. वाल्मीक अहिरे यांनी ‘बाप’ या कवितेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार एका पित्याने कसा आत्मसात केला होता, हे भावस्पर्शी शब्दांत मांडले. कवी अरविंदा भामरे यांनी ‘फाईल’ या कवितेतून शासकीय दप्तर दिरंगाई आणि बेरोजगार तरुणाच्या आयुष्यातील संघर्षावर मार्मिक भाष्य केले. याच फेरीत मराठी विभागाच्या डॉ. भारती सोनवणे यांनी ‘तिच्या जखमांचा नासूर’ ही कविता सादर केली, तर एम. ए. इंग्रजी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी योगेश पाटोळे याने ‘बाप’ ही स्वलिखित कविता सादर करून बाप नसलेल्या मुलाचे दुःख व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी ‘बा, तथागता!’ या काव्यातील शेवटच्या वेचांमधून माणूसपणाचे मर्म उलगडणाऱ्या ओळी सादर करून अध्यक्षीय समारोप केला. या कवी संमेलनास भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील मराठी, हिंदी व इंग्रजी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारती सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. दीपक खरात यांनी केले.









