जळगाव;- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पीएच.डी. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मौखिक (व्हायवा) परीक्षा घेणे शक्य नसल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ऑनलाईन पीएच.डी. व्हायवा घ्यायला सुरुवात केली असून या आठवड्यात दोन विद्यार्थ्यांचे व्हायवा घेण्यात आले.

लॉकडाऊनमुळे ३० जून पर्यंत शैक्षणिक कामकाज बंद आहे. लॉकडाऊनपूर्वी पीएच.डी. संशोधन करणाऱ्या काही संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधनाचे काम पूर्ण झाल्यामुळे मौखिक परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या तथापि लॉकडाऊनमुळे मौखिक परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केलेली मार्गदर्शक तत्वे तसेच शासनाने दिलेल्या सूचनेनुसार पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या मौखिक परीक्षा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेता येणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील व प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी या संदर्भात पुढाकार घेऊन ज्या संशोधक विद्यार्थ्यांच्या मौखिक परीक्षा स्थगित झाल्या होत्या त्या आता ऑनलाईन घेण्याला मान्यता दिली असून त्या संदर्भात १५ जून रोजी विद्यापीठाचे सहायक कुलसचिव (संशोधन) व्ही.व्ही.तळेले यांच्या स्वाक्षरीचे परिपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. गुगलमिट, स्काईप, मायक्रोसॉफ्ट टिम्स ह्या तंत्रज्ञानाद्वारे मौखिक परीक्षा घेता येणार आहेत.
अरूण चौधरी या संशोधक विद्यार्थ्यांची मंगळवारी भौतिकशास्त्र या विषयातील ऑनलाईन पीएच.डी.मौखिक परीक्षा घेण्यात आली तर बुधवारी जनसंवाद व पत्रकारिता या विषयात अनिल लोहार या संशोधक विद्यार्थ्याची ऑनलाईन मौखिक परीक्षा पार पडली. या तंत्रज्ञानामुळे संशोधक विद्यार्थ्यांना घरबसल्या मौखिक परीक्षा देता येणार आहेत. विद्यार्थ्यांकडून या प्रक्रियेचे स्वागत करण्यात आले आहे.







