जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी., एम.एस.डब्ल्यू., एम.ए.(एम.सी.जे.), एम.बी.ए., एम.एम.एस. (कॉम्प्युटर मॅनेजमेंट), एम.सी.ए., एम.सी.ए. इंटीग्रेटेड पदव्युत्तर अभ्यसक्रमाच्या प्रथम वर्ष प्रथम सत्रास प्रवेशित नियमित विद्यार्थ्यांच्या आणि प्रथम वर्ष इंजिनियरींग सत्र १, व्दितीयवर्ष इंजिनियरींग सत्र ३, बी.फार्मसीचे सत्र १ आणि ३ आणि विद्यापीठ प्रशाळातील पदव्युत्तर वर्गांच्या सत्र १ या सर्व अभ्यासक्रमांच्या लेखी परिक्षा ऑनलाईन पध्दतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यांयी (MCQ) स्वरुपात स्मार्ट फोन / लॅपटॉप / वेब कॅमेरासह डेस्कटॉप संगणक याव्दारे १८ मे, २०२१ पासून ऑनलाईन सुरु होणार असून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सॉफटवेअरच्या हाताळणी व सरावाकरीता सराव चाचणींना (Mock Test) प्रारंभ झाला आहे.
वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असे परीक्षेचे स्वरूप असून पदवीस्तरावरील परीक्षेसाठी ९० मिनिटे व पदव्युत्तरस्तरावरील १२० मिनिटे असा कालावधी राहील. दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे अतिरिक्त वेळ दिला जाईल. ज्या विषयाच्या वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेत ६० प्रश्न असतील यातील कमीत कमी ४० प्रश्न सोडवायचे आहेत तर ज्या प्रश्नपत्रिकेत ४० प्रश्न असतील त्यापैकी विद्यार्थ्यांनी कोणतेही ३० प्रश्न सोडवायाचे आहेत. ज्या प्रश्नपत्रिकेत ३० प्रश्न असतील त्यापेक्ी कोणतेही २० प्रश्न सोडवायचे आहेत.
ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना डेस्कटॉप/लॅपटॉप/स्मार्टफोनचा वापर करता येईल. या परीक्षांसाठी मागील परीक्षेत नियुक्त केलेल्या आयटी समन्वयकांची नियुक्ती या परीक्षेकरीता कायम ठेवण्यात आली आहे. तांत्रिक व्यत्यय आल्यास विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काय केले पाहिजे याच्या मार्गदर्शक सूचना परीक्षार्थींना देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लॉगइन होण्यासंदर्भात माहिती देणारा व्हीडीओ अपलोड करण्यात आला आहे व माहिती पुस्तिका देखील देण्यात आली आहे. विद्यापीठाच्यावतीने सरावासाठी मॉकटेस्ट घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे व प्रवेशपत्र (हॉलतिकिट) वरील विषयांप्रमाणे परीक्षा द्यावी.
विद्यार्थ्यांनी परीक्षा देतांना ऐनवेळी उदभवणाऱ्या कोणत्याही तांत्रिक व्यत्ययाची भीती बाळगू नये. कारण या विद्यार्थ्यांना विंडो कालावधी तीन तासाचा दिला जाणार आहे. परीक्षा देतांना ऐनवेळी वीज पुरवठा खंडीत झाला अथवा काही तांत्रिक व्यत्यय आला तर कसे होईल अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यादृष्टीकोनातून विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री. बी.पी. पाटील यांनी काही तांत्रिक बाबींची माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे. ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://nmu.unionline.in या लिंक वर जाऊन त्याठिकाणी विचारण्यात आलेला User ID व PRN No. टाकावा. Password साठी विद्यार्थ्याची जन्मतारीख हीच विद्यार्थ्याचा Password आहे (उदा. 06/10/1999 ही जन्मतारीख असेल तर Password हा 061099 असा असेल). त्यानंतर Active Test वर क्लीक करून आपली विद्याशाखा (Faculty) आणि Program Name निवडायचा आहे. तो क्लीक केल्यानंतर शेवटी Course Code/Subject Name हे आपल्या Hall Ticket वर दिल्याप्रमाणे निवडायचे आहे.
त्यानंतर परीक्षेसाठी विद्यार्थी Login होईल. Login यशस्वी झाल्यानंतर फोटो ओळखपत्राची पडताळणी होईल व या पडताळणी नंतर परीक्षेला प्रारंभ होईल. Login करतांना अयशस्वी झाल्यास विद्यार्थ्याने आपला Password हा बिनचूक आहे की नाही याची पडताळणी करावी. त्यानंतरही Login होत नसल्यास संकेतस्थळाच्या प्रशासकाशी परीक्षार्थी हा Chatbot द्वारे तात्काळ संपर्क साधू शकतो. त्याच्या शंकेचे लगेच निरसन केले जाईल. त्यानंतरही हा प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्याने Trouble Logging in चा पर्याय निवडावा त्यामध्ये विद्यार्थ्याने आपला PRN No. टाकावा विद्यार्थ्याच्या Reigstered केलेल्या मोबाईलवर OTP प्राप्त होईल. तो OTP टाकल्यानंतर विद्यार्थी परीक्षेसाठी Login होईल. हा पर्याय देखील यशस्वी झाला नाही तर विद्यार्थ्यांनी संबधित महाविद्यालयाच्या असलेल्या आय.टी. समन्वयकाशी तात्काळ संपर्क साधावा. त्या विद्यार्थ्याच्या शंकेचे निरसन केले जाईल. प्रश्नाचे उत्तर निवडताना A B C D समोरील रेडीओ बटनवर क्लिक करावे. या पध्दतीने परीक्षा दिली तर कोणती ही अडचण निर्माण होणार नाही. प्रश्नपत्रिका सोडवत असतांना वीज पुरवठा खंडीत झाला अथवा काही तांत्रिक व्यत्यय आला तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेचा उर्वरीत कालावधी दिला जाणार आहे. परीक्षार्थींचा विंडो कालावधी तीन तासाचा असणार आहे. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री. बी.पी. पाटील यांनी दिली.