जळगावात कृषी सहाय्यकांचे प्रलंबित मागण्यांसाठी धरणे सुरु
जळगाव (प्रतिनिधी) : – कृषी विभागातील कृषी सहाय्यकांनी त्यांच्या प्रलंबित आणि विविध मागण्यांसाठी जिल्हा कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. शासनाने वेळोवेळी पाठपुरावा करूनही कृषी सहाय्यकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
यापूर्वी १० फेब्रुवारी रोजी देखील कृषी सहाय्यकांनी आंदोलन पुकारले होते. त्यावेळी शासनाने पंधरा दिवसात मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत कृषी सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने आज जिल्हा कृषी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलकांनी आपल्या प्रमुख मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत.
यामध्ये कृषी सेवक कालावधी रद्द करून त्यांना नियमित कृषी सहाय्यक पदावर त्वरित नियुक्त करावे, कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे, कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात असतानाही कृषी सहाय्यकांना लॅपटॉप पुरवण्यात यावा, ग्राम स्तरावर काम करताना कृषी मदतनीस आणि वाहतूक भाड्यापोटी कृषी सहाय्यकांना येणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी त्यांना नियमित वाहतूक भत्ता देण्यात यावा, यांसारख्या मागण्यांचा समावेश आहे. आपल्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात, अन्यथा नाइलाजास्तव कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.