जळगाव मनपाचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यापासून महापालिका प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. बुधवारी १७ डिसेंबर रोजी मतदान केंद्रांची पाहणी करून त्यासाठी १४५ इमारती देखील निश्चित केल्या आहे. मागील निवडणुकीत ५४ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदान वाढीसाठी महापालिका प्रशासन विविध माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करून ६० टक्क्यांवर मतदानाचा आकडा नेण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या आयुक्तांनी बुधवारी पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड उपस्थित होते. निवडणूक तयारीबाबत पुढे बोलताना आयुक्त म्हणाले, की निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, त्यासाठी साडेतीन हजार कर्मचारी लागणार आहे. मतदान प्रक्रियासाठी ५६८ कंट्रोल युनिट, १ हजार १३६ बॅलेट युनिट असणार आहे. तसेच रविवारपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय स्थापन करण्याचे कामकाज पूर्ण होणार आहे. तसेच उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या महापालिकेच्या विभागातील विविध परवानग्यांसाठी ‘एक खिडकी’ योजना महापालिका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सुरू केली आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
निवडणुकीत मतदान साहित्य वाटप, सील, तसेच मतदान साहित्य ठेवण्याचे स्ट्राँग रूम व मतमोजणी ही वखार महामंडळाच्या दोन गुदामात होणार आहे. या गुदामांची मंगळवारी आयुक्तासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. महानगरपालिकेची आचारसंहिता सोमवार दि. १५ डिसेंबरपासून लागू झाली असून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जळगाव मनपाचे अतिक्रमण निर्मूलन विभाग व बांधकाम विभागातर्फे दोन दिवसात १६८ बॅनर / फलक व ७३ झेंडे काढण्यात आले. महानगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून दि. १५ डिसेंबर पासून शहरात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांचे बॅनर, होडींग, झेंडे काढण्याची मोहिम मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या आदेशाने अतिक्रमण महानगरपालिकेच्या निर्मूलन विभाग व बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आली आहे.









