पाचोरा येथील प्रकार
पाचोरा (प्रतिनिधी) :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुक – २०२४ करीता दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. सदर मतदान प्रक्रियेकरीता पाचोरा विधानसभा मतदार संघाचे प्रथम प्रशिक्षण दि. २७ रोजी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (खत कारखाना) गिरड रोड पाचोरा येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात २ कर्मचारी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली म्हणून त्याना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ प्रथम प्रशिक्षण वर्ग हा अत्यंत महत्वाचा भाग असल्याने सदर प्रशिक्षण वर्गास मतदान प्रक्रिये विषय सखोल मार्गदर्शन व मतदान यंत्र हाताळणी तसेच सराव परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सदर ठिकाणी प्रशिक्षण सुरू असतांना कळमसरा जि. प. शाळेचे उपशिक्षक किशोर पाटील व नगरदेवळा ता. पाचोरा येथील के. एस. पवार हायस्कूलचे उपशिक्षक इकबाल अ. मजीद शेख यांनी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (खत कारखाना) गिरड रोड, पाचोरा येथे प्रशिक्षण वर्गात न बसता बाहेर उभे होते. त्यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना प्रशिक्षण वर्गात बसुन घेणे बाबत सांगीतले.
मात्र दोन्ही शिक्षक प्रशिक्षण वर्गात न बसता त्यांनी निवडणुकीवर कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचेशी हुज्जत घातली व मला प्रशिक्षणास बसायचे नाही व मला प्रशिक्षण घ्यायचे नाही, असे प्रशिक्षण मी यापुर्वीच भरपुर वेळा घेतलेले आहे, असे सांगुन गोंधळ घातला व कामकाजामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे. हे निवडणूक निर्णय अधिकारी भुषण अहिरे यांच्या निदर्शनास आले. शिक्षक किशोर पाटील व इकबाल अ. मजीद शेख यांचे विरूध्द शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडे का पाठविण्यात येवू नये ? तसेच आपणाविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० मधील तरतुदी नुसार कारवाई का करण्यात येवू नये ? याबाबतचा लेखी खुलासा २४ तासाच्या आत सादर करावा. तसेच आपला खुलासा मुदतीत प्राप्त न झाल्यास, आपले काहीही एक म्हणणे नाही, असे गृहीत धरण्यात येईल. अशी नोटीस उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भुषण अहिरे यांनी संबंधित कर्मचारी यांना दिली आहे.