जळगाव ( प्रतिनिधी ) – बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांची जुगलबंदी रंगात आली आहे पालकमंत्र्यांनी केलेल्या टीकेला नाथाभाऊंनी प्रत्युत्तर दिले आहे .
शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथराव खडसे यांना बोदवड नगरपंचायत प्रचार सभेत डिवचलं सलग ३० वर्षे आमदार राहिलेल्या माणसाने काय केलं ? , माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले . त्यावर गुलाबराव पाटील यांना व जिल्ह्यातील लोकांना नाथाभाऊंनी तीस वर्षात काय केलं हे माहिती आहे. हेमा मालिनी त्यांना का आठवली हे माझ्या लक्षातं आलं नाही. ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणं ते बोलले असतील. मी त्याची फार दखल घेत नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले. स्वाभाविकपणे निवडणुकीच्या ओघात केलेलं ते भाष्य आहे. ज्यावेळेस तीस वर्ष एखाद्या लोकप्रतिनिधीला लोक निवडून देतात त्यावेळी त्यानं काम केल्याशिवाय देत नाहीत. मला राजकारणात चाळीस वर्ष झाली आहेत. मी चाळीस वर्षात एकही निवडणूक हारलो नाही. जळगावच्या विकासकामामध्ये सर्वाधिक काम मी केलंय, असं एकनाथ खडसे म्हणाले.
गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकावर जोरदार टीका केली. माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवाल देखील गुलाबराव पाटील यांनी केला.