ठाणे कारागृहात केले स्थानबद्ध
एरंडोल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील उत्राण येथील नीलेश कोळी याच्याविरोधात विविध कलमांद्वारे अनेक गुन्हे दाखल होते. तरीदेखील त्याच्या वागणुकीत सुधारणा होत नसल्याने व सामाजिक सुव्यवस्थेला धोका निर्माण झाल्यामुळे कासोदा पोलिसांनी एमपीडीएअंतर्गत प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. त्यानुसार निलेश कोळी याला स्थानबद्ध करण्यात आले आहे.

मारहाण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, विनयभंग, गौण खनिजचोरीसह अनेक गुन्हे दाखल असलेल्या नीलेश भिला कोळी (वय ३०) या तरुणाविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती; परंतु त्याच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. त्याला स्थानबद्ध करून ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे. पोहेकों, नरेंद्र गजरे यांनी प्रस्ताव सादर करून योग्य त्या कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठवला होता. या कारवाईत स.पो.नि नीलेश राजपूत, उपनिरीक्षक दत्तू खुळे राकेश खोंडे, श्रीकांत गायकवाड, नंदलाल परदेशी, धर्मेंद्र ठाकूर, अकिल मुजावर किरण गाडीलोहार, अमोल गवळी, लहू हटकर, कुणाल देवरे यांनी परिश्रम घेतले आहेत.









