फैजपूर प्रांतांना कोळी समाजबांधवांचे निवेदन
रावेर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ, समस्त आदिवासी कोळी समाजाने फैजपूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. शिवाजी वाल्मीक मेळके (वय ३२) या तरुण कोळी समाजाच्या व्यक्तीने जात प्रमाणपत्र मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे आत्महत्या केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

शिवाजी मेळके यांनी आपल्या मुलांच्या शालेय शिष्यवृत्तीसाठी महादेव कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक वर्षापूर्वी निलंगा येथील उपविभागीय कार्यालयात अर्ज केला होता. परंतु, वर्षभरानंतरही त्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे त्यांची मुले शिष्यवृत्तीपासून वंचित राहतील, या चिंतेतून त्यांनी १३ सप्टेंबर २०२५ रोजी विजेच्या तारांना स्पर्श करून जीवन संपवले, असे निवेदनात म्हटले आहे. या घटनेमुळे त्यांची दोन मुले अनाथ झाली आहेत.
या गंभीर घटनेला जबाबदार धरून, निलंगा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच मेळके यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.याव्यतिरिक्त, भविष्यात टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी यांसारख्या अनुसूचित जमातींना जात प्रमाणपत्रे सहज उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे. भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट असलेल्या या समुदायांना त्यांचे हक्क मिळत नसल्याचा आरोपही निवेदनात केला आहे.
या निवेदनावर प्रभाकरअप्पा सोनवणे (वढोदा), जितेंद्र सपकाळे सर (भुसावळ), खेमचंद कोळी (पाडळसे), नितीन कोळी (अंजाळे), कैलास सोनवणे (बामणोद), जगदीश सपकाळे, गणेश कोळी, नितीन पंडित, गणेश पुंडलिक, योगराज सोनवणे, भिका रूपकाळे, विकास सपकाळे, समाधान कोळी, इत्यादींच्या सह्या आहेत.









