पोलीस अधीक्षक डॉ.मुंढे यांचे प्रतिपादन ; डॉ. रोहन यांना भावपूर्ण निरोप
जळगाव (प्रतिनिधी) – संयमी असणे, भुमिका स्पष्ट असणे, नम्र व मेहनत करण्याची तयारी तसेच प्रामाणिकपणा हे सर्व पाच गुण प्रत्येकामध्ये असायला हवेत. हे गुण प्रत्यक्ष काम करत असताना वापरल्याने नीलाभ रोहन यांनी उत्कृष्ट कार्य जळगाव मध्ये केले, असे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे म्हणाले. त्यांच्या यशाचा आलेख चढता राहणार आहे. भविष्यात देखील उत्कृष्ट प्रगती करण्याच्या दृष्टीने त्यांनी जळगावला त्यांच्या कार्यातून पायाभरणी केली आहे, असेही गौरवोद्गार डॉ. मुंढे यांनी केले.
येथील जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा, डॉ. नीलाभ रोहन उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. रोहन यांच्याविषयी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी त्यांचे अनुभव सांगितले. अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तपासामध्ये डॉ. रोहन यांनी मार्गदर्शन करून गुन्हेगार शोधण्यासाठी खूप मोलाची मदत केली. त्यांची वैचारिक ताकद, तर्कशक्ती, बुद्धिमत्ता, अभ्यास, संयम, धडाडीचा स्वभाव यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण राहिले असेही अनुभव कथनातून अनेकांनी सांगितले. सूत्रसंचालन एलसीबी पोलीस निरीक्षक डॉ. बी.जी. रोहोम यांनी केले.
डॉ.रोहन यांनी धडाकेबाज कामगिरी केली. बेसिक पोलिसिंग म्हणजेच वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करतात. कोणतेही काम व्यवस्थित झाले पाहिजे, त्यात उणिवा नको असा स्वभाव रोहन यांनी ठेवला. संयम हा चांगला गुण आहे , तो पोलिसांनी ठेवला पाहिजे, असे एएसपी चंद्रकांत गवळी यांनी सांगितले.
डॉ.रोहन यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, माझ्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणात मी काम केले. मला सहकाऱ्यांचे, वरिष्ठांचे खूप सहकार्य लाभले. माझ्यासाठी हे दोन वर्ष म्हणजे शिकण्यासारखे होते. जिल्ह्यात अनेक आव्हानात्मक गुन्हेगारी होती. याचा अनुभव मला भविष्यात कामात येईल. काम करताना अनेक वेळा ताण आला. कामात गुंतागुंत देखील वाढली. मात्र तणाव कधी घेतला नाही. आयजी, एसपी, एएसपी यांनी नेहमी विश्वास दाखविला. प्रोत्साहन दिले. त्यामुळे कामामध्ये मन लावून झोकून दिले. प्रत्येक कामामध्ये त्यामुळे मला यश मिळत गेले, असेही त्यांनी भावपूर्ण वातावरणात सांगितले.
एसपी डॉ.मुंढे यांनी डॉ.रोहन यांचे कार्याचा गौरव करीत त्यांना भावी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या. यावेळी अनेक पोलिस स्टेशनचे निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.