महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जामनेर शाखेचा उपक्रम
जामनेर (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जामनेर शाखेतर्फे तालुकास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रविवारी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत २७ विद्यालयातील १६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
पारितोषिक वितरण सोहळा जळगाव जिल्हा निवृत्त सेवा संघ येथील दा.शा. पाटील सभागृहात घेण्यात आला. या वेळेला अध्यक्षस्थानी समितीचे वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्प विभागाचे राज्य कार्यवाह प्रा. दिगंबर कट्यारे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष भुसावळ येथील राजेंद्र बाविस्कर, नाना लामखेडे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी, जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे, शाखा अध्यक्ष जे. डी. पाटील, सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष पी. एन. पाटील उपस्थित होते.
प्रस्तावनामधून निबंध स्पर्धा घेण्यामागील उद्देश उपाध्यक्ष नाना लामखेडे यांनी व्यक्त केला. यानंतर मान्यवरांनी आपल्या मनोगतातून, निबंध स्पर्धेमधून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होतो असे सांगून बौद्धिक मशागत करणाऱ्या स्पर्धा पुन्हा पुन्हा घेतल्या पाहिजेत असे सांगितले. अध्यक्षीय भाषणातून प्रा. दिगंबर कट्यारे यांनी बुद्धीला सत्याकडे नेणारे शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
सूत्रसंचालन अध्यक्ष बी. आर. पाटील यांनी तर आभार प्रल्हाद बोऱ्हाडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी दीपक अहिरे, वीरेंद्र, कैलास सुरळकर, जी. डी. राजपूत, प्रा. सुनील पाटील, उषा सुरळकर, विजय सैतवाल, शाखेचे सचिव भीमराव दाभाडे, उपाध्यक्ष रमेश गायकवाड, डॉ. मोहिनी मोरे, शोभा बोऱ्हाडे, तीर्थराज सुरवाडे, डी.एस. पाटील युवराज सुरळकर, रामदास सोनवणे, एन. एस. पाटील, तीर्थराज इंगळे आदींनी परिश्रम घेतले.