जळगाव (प्रतिनिधी) – येथील गणेशवाडीमधील रहिवासी महिलेला ऑनलाईन गंडा घालत एकूण ८४ हजार ९९४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अखेर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गणेशवाडी येथील रहिवासी सीमा राजेश शर्मा यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे याना भेटून तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार गुरुवारी १ ऑक्टोबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत म्हटले आहे कि, शर्माजी कि रसोई नावाने यु ट्यूब चॅनेल चालविते. त्याचे पैसे मला कोटक बँकेच्या खात्यात पडतात. २३ सप्टेंबर रोजी मला पैसे पडल्याची माहिती यु ट्यूबने ईमेल द्वारे पाठविली होती. मात्र पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे गुगलवर कोटक बँकेचा नम्बर सर्च करून मिळविला. त्यावर संपर्क केला असता पलीकडच्या व्यक्तीने टीमव्ह्यूवर क्विक सपोर्ट हे अँप डाउनलोड करायला सांगितले. त्यानंतर सीआरएन नम्बर मागितला. वेळोवेळी ८ वेळा सीमा शर्मा यांच्या अकाऊंट मधून ८४ हजार ९९४ रुपये काढण्यात आले आहे. मला न्याय मिळावा अशी विनंती सीमा शर्मा यांनी केली आहे.
फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आला आहे. तपास हेकॉ संजय भोई करीत आहेत.