जळगाव (प्रतिनिधी) : राज्य शासनाने जिल्ह्यातील ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी २८ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा काढले आहेत. यामध्ये जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची नांदेड येथे जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी लातूर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रधान सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी याबाबत नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये राज्यभरातील ४४ आयएएस ऑफिसर्सचा समावेश आहे. कोरोना काळामध्ये जळगाव जिल्ह्यावर मोठे संकट आले असताना अभिजीत राऊत यांची प्रथमच जिल्हाधिकारी म्हणून निवड होऊन जळगावला नियुक्ती झाली होती. अतिशय कुशलपणे आणि नियोजनबद्ध, नेतृत्वाचा कस लावून अभिजीत राऊत यांनी जिल्हाभरातून कोरोना हद्दपार केला. त्याचबरोबर जिल्ह्यातील महसूल, कृषी, शैक्षणिक, औद्योगिक आदि महत्त्वाच्या विषयांवर काम करीत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. कर्तव्यदक्ष व शिस्तबद्ध अधिकारी म्हणून जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांची विशेष ओळख राहिली.
आता ते नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून जात आहेत. तेथे जळगावचे असलेले मंत्री गिरीश महाजन हेच पालकमंत्री आहेत.