जळगावच्या डॉ. विद्या पाटील यांचा समावेश
जळगाव (प्रतिनिधी) : राज्यात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मंगळवारी दि. ११ जुलै रोजी समिती गठीत केली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे असून या समितीत जळगाव येथील मु. जे. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. विद्या रत्नाकर पाटील (व्यवहारे) यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
राज्यात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्यातील विधीमंडळ सदस्य, अखिल भारतीय साहित्य महामंडळ, अखिल भारतीय महानुभाव साहित्य युवामंच, जागतिक महानुभाव वासनिक परिषद अशा विविध संघटना व व्यक्तींकडून मागणी करण्यात आलेली आहे. सन २०२३ च्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी रिद्धपूर, जि. अमरावती येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेबाबत घोषणा करण्यात आली आहे. उपरोक्त पार्श्वभूमीवर राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेबाबत समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेच्या अनुषंगाने समिती गठीत करण्यात येत आहे.
समितीत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळचे अध्यक्ष सदानंद मोरे, महाराष्ट्र विधानमंडळ मराठी भाषा समितीचे अध्यक्ष व सदस्य, जळगाव येथील डॉ. विद्या रत्नाकर पाटील (व्यवहारे), नागपूरचे प्रा. राजेश नाईकवाडे, मराठी भाषा विभागाचे सह सचिव हे असून अमरावती विभागाचे उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सह संचालक, सदस्य सचिव राहतील. समितीचे कार्यकक्षा ठरविण्यात आली आहे. यात मराठी भाषा विद्यापीठाचे स्थान, आवश्यक जमीन, बांधकाम- जागेची आवश्यकता, योग्यता या सर्व बाबी विचारात घेऊन शिफारस करणे. विद्यापीठ स्थापनेच्या अनुषंगाने खर्चाचा अंदाज, अध्यापक, अध्यापकेत्तर कर्मचारी किती असावेत, विद्यापीठाचे विविध विभाग व विद्यापीठाची सर्वसाधारण रचना याबाबतचा सविस्तर आराखडा, विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध होतील, याबाबत शिफारस करणे. मराठीच्या सर्व बोली भाषांच्या संवर्धनासाठी विद्यापीठांतर्गत उपाययोजना आदींचा समावेश आहे.
उपरोक्त कार्यकक्षेतील मुद्दे तसेच समिती विद्यापीठ स्थापनेसाठी योग्य वाटतील अशा बाबींसाठी विविध तज्ञ व्यक्ती आणि संस्था यांचेशी विचारविनिमय करून सर्व समावेशक सविस्तर तपशीलासह दोन महिन्यांत शासनास अहवाल सादर करील, असे परिपत्रकात नमूद असून परिपत्रकावर उपसचिव अ. म. परदेशी यांची सही आहे. दरम्यान, विद्या पाटील यांच्या निवडीमुळे जळगावच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांना अध्यापनाचा २७ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी पीएचडी, एमफिल शिक्षण पूर्ण केले असून अनेक रिसर्च प्रोजेकट सादर केले आहेत. शासनाने त्या कबचौ उमवि विद्यापीठाच्याही विविध समित्यांवर आहेत. शासनाने दिलेल्या संधीचे सोने करून मराठी भाषा संवर्धनासाठी तसेच, विद्यापीठ उभारणीसाठी सकारात्मक योगदान देईल. मराठी भाषा विद्यापीठाच्या उभारणीत माझा सहभाग राहील, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. विद्या पाटील यांनी “केसरीराज” शी बोलताना दिली आहे.