मुंबई ( प्रतिनिधी ) – स्वच्छ भारत मिशनमध्ये स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोरोना रोखण्यासाठी हातांची स्वच्छता महत्वाची आहे. स्वच्छ हात धुवून आरोग्य सांभाळले पाहिजे असे प्रतिपादन पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

१५ ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, जिल्हा स्तरावरून सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकरी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, जागतिक हात धुवा दिन निमित्ताने विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात यावी. साबणाने हात धुण्याच्या सवयीमुळे श्वसन रोगाचा मृत्यु दर 25 टक्के कमी होऊ शकतो आणि अतिसार रोगामुळे होणारे मृत्यू सुद्धा 50 टक्के कमी होऊ शकतात शाळास्तरावरदेखील विद्यार्थ्यांमध्ये साबणाने हात धुण्याची सवय व्हावी याकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. असेही त्यांनी सांगितले.
पाच दिवस राज्यभरात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन आरोग्य संवर्धनाच्या कामात पुढाकार घ्यावा असे सांगून स्वतः हात धुवून हात कसे धुवावेत याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले.







