५७६ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार्या जलसेतूचे लोकार्पण
जळगांव (प्रतिनिधी) – बोरगाव खुर्द आणि बुद्रुक गावांसाठी अंजनी नदीवरून ३ कोटी रूपयांच्या पाणी पुरठा योजनेला मंजुरी मिळाली असून लवकरच कामास प्रारंभ होणार असल्याची घोषणा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज केली. या दोन्ही गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची संपणार असल्याचे ते म्हणाले. अंजनी कालव्यावरील जलसेतूचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
बोरगाव ते धरणगाव व बोरगाव ते टोळी या रस्त्यांची कामे मार्गी लागणार असून तरूणांसाठी व्यायामशाळा बांधकाम आणि मारोती मंदिरालगत २० लाखांचे सभामंडप मंजूर करण्यात आल्याचेही पालकंमत्र्यांनी जाहीर केले. अंजनी कालव्यावरील जलसेतूमुळे ५७६ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. बोरगाव खुर्द, बुद्रुक, टोळी, पाळधी आणि बांभोरी खुर्द शिवारातील शेतकर्यांना लाभ होणार आहे . याच कार्यक्रमात पेव्हींग ब्लॉक, जलशुध्दीकरण आणि कॉक्रिटीकरणाच्या कामांचे लोकार्पणदेखील पालकमंत्र्यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, महिला आघाडी तालुका प्रमुख जनाबाई पाटील यांच्यासह बोरगाव बुद्रुकचे सरपंच लक्ष्मण मोरे, खुर्दचे सरपंच आबा पाटील, उपसरपंच नितीन पाटील, विकासो चेअरमन मालू बिर्ला, व्हाईस चेअरमन माधव पाटील व संचालक , उपसभापती प्रेमराज पाटील, माजी सभापती अनिल पाटील , पं.स सदस्य मुकुंद नन्नवरे, प्रमोद पाटील, ग्रापं सदस्य महेश मराठे, किशोर मराठे, ज्ञानेश्वर मराठे, बापू पवार, किशोर शेडगे, गोकुळ पाटील, उपअभियंता. बनसोड, शाखा अभियंता रवींद्र चौधरी, ठेकेदार पुंडलिकराव कांजे, माधव पाटील, निंबा कंखरे, पिंटू पाटील, पप्पू पाटील, गोविंद पाटील, संभाजी पाटील आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक भगवान महाजन यांनी केले.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्यमंत्री व आमदार असतांना ९० टक्के कामे पूर्ण केली आहेत. बोरगाव ते धरणगाव रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १ कोटी निधी मंजूर केला असून कामाला सुरूवात होणार आहे. बोरगाव ते टोळी हा ३ किलोमीटरचा रस्ता मंजूर करून मार्गी लावणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
ना. गुलाबराव पाटील यांनी अंजनी धरणावरून बोरगावसह परिसरात १० किलोमीटरचा कालवा मंजूर केला होता. तब्बल ५७६ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार होती. मात्र कालवा पूर्ण झाला असला तरी जलसेतूच्या अभावामुळे फक्त ६ किलोमीटरपर्यंतच कालव्यातून पाणी जात होते. पालकमंत्र्यांनी २ कोटी ३१ लक्ष निधी मंजूर करून जलसेतूचे काम पूर्ण केले. आता पूर्ण १० किलोमीटरपर्यंत कालव्यातून शेतकर्यांना पाणी मिळणार आहे.
या सत्काराला उत्तर देतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सध्या काही जण सीझनेबल पुढारी बनले असून त्यांच्यापासून जनतेने सावध राहण्याचा इशारादेखील दिला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन भैय्या मराठे यांनी केले.