पारोळा शहरातील बालाजी वहनोत्सव मिरवणुकीतील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : शहरातील झपाट भवानी चौकामध्ये श्री बालाजी वहन मिरवणूक सुरु असताना मुलामध्ये आपसात झालेल्या वादामुळे दोन गटात दगडफेक होऊन त्यात नऊ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना दि.३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. दि.४ रोजी पहाटे दोघे गटातील २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री बालाजी महाराज यांचे वहन झपाट भवानी चौकात आले होते. दुर्गा देवी मंडळात आरती सुरु होत असताना अचानक दगडफेक सुरु झाली. यावेळी तोकडे पोलीस बंदोबस्त होते. होमगार्ड यांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव आवरता येत नसल्याचे पाहून पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी अमळनेर, एरंडोल, भडगाव, धरणगाव येथून पोलीस दल मागवून दंगा काबू पथक मागविण्यात आले. दोन गटात तेढ असल्याने हा वाद जुना असून काल घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी श्री बालाजी महाराजांच्या पहिल्या वाहन मिरवणुकीत हा प्रकार घडल्याने तुफान दगडफेक करण्यात आली.
यात जळगाव येथील पोलीस उपनिरीक्षक मंजुळा विलास तिवारी यांच्या हाताला व पायाला गंभीर मार लागला आहे. तर पारोळा येथील गोपनीय शाखेचे हेड कॉन्स्टेबल महेश रामराव पाटील, अमरावती सीआरपीएफचे हेड कॉन्स्टेबल उमेश विठ्ठल पुरी (वय ४२), माणिक आत्माराम राठोड (वय ५८), पोलीस कॉन्स्टेबल आशिष कुमार सुरेशराव शिदोडकर (वय ३६) तसेच होमगार्ड भटू पंडित पाटील (वय ४५, रा. विचखेडा), धोंडू रोहिदास लोंढे (वय ३५, रा. पारोळा), भैय्यासाहेब रमेश पाटील (विचखेडा), ईश्वर कौतिक पाटील (नेरपाट) असे नऊ जण जखमी झाले. या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला २४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.