जामनेर तालुक्यातील ओझर जंगलातील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील ओझर गावाजवळच्या जंगलात बकऱ्या चारायला गेलेली महिला पाला तोडण्यासाठी झाडावर चढली असता पाय सटकून ती बुधवारी दि. २९ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उंचावरून खाली पडली. घटनेमध्ये ती गंभीर जखमी झाली होती. दरम्यान जळगावात उपचार सुरू असताना गुरुवारी दि. ३० मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला शून्य क्रमांकाने नोंद करण्यात आली आहे.
संगीता भानुदास साबळे (वय ४६, रा. ओझर बुद्रुक ता. जामनेर) असे मयत महिलेचे नाव आहे. ही महिला ओझर गावात पती, दोन मुले यांच्यासह राहत होती. संगीता आणि त्यांचे पती भानुदास हे हातमजुरी काम करून मिळेल त्या उत्पन्नावर परिवाराची गुजराण करीत होते. त्यांच्याकडे काही बकऱ्या होत्या. त्या बकऱ्या चारण्यासाठी ते ओझर जवळच्या जंगलात नेहमी जात असायचे. दरम्यान बुधवारी दि. २९ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास संगीता साबळे या बकऱ्या घेऊन ओझर जवळच्या जंगलात गेलेल्या होत्या. त्यावेळेला बकऱ्यांना पाला खाण्यासाठी म्हणून त्या एका झाडावर चढल्या.
बकऱ्यांना पाला तोडून खाली टाकत असताना अचानक फांदीवरून त्यांचा पाय सटकला व उंचावरून त्या खाली पडल्या. यात त्यांच्या मानेच्या भागावर, छातीला, मणक्याला जबर मार लागला. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना गुरुवारी दि. ३० मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला शून्य क्रमांकाने घटना नोंद होऊन जामनेर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आली आहे.